स्वत: ड्रायव्हर सीटवर बसून अभिनेत्याने बस चालवली… प्रशांत दामलेंनी केलं कौतुक
चालक आजारी पडल्यावर त्याला आराम मिळावा यासाठी एका आघाडीच्या अभिनेत्याने बसची धुरा सांभाळत लोणावळ्यापर्यंत ड्रायव्हिंग केले. अभिनेते प्रशांत दामले यांनी त्याचे कौतुक केले आहे.

मुंबई : एखादी परिस्थिती उद्भवली तर आपल्याला काय काम करावं लागू शकतं हे सांगता येत नाही. त्यामुळे कोणतच काम छोटं किंवा मोठं मानू नये असं म्हणतात. कलाकारांच्या बाबतीतही असं घडू शकतं… काही झालं तरी त्यांना त्यांचं काम सुरू ठेवाव लागतं, थांबता येत नाही कारण Show must go on.. हे त्यांच ब्रीदवाक्य असतं. रात्रंदिवस नाटकाचे प्रयोग करत धावपळ करणारे हे कलाकार प्रयोगासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना तेवढी विश्रांती घेतात. एकापाठोपाठ एक असं त्याचं काम, प्रयोग सुरूच असतात. पण त्यांना इकडून तिकडे नेणाऱ्या गाडीचा चालकच नसेल तर काय करणार ? पण तेव्हाही न थांबता त्यांचा प्रवास सुरूच राहतो, कसा ? त्याचं उत्तर म्हणजे संकर्षण कऱ्हाडे…
मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता, लेखक, कवी आणि दिग्दर्शक अशा सर्व धुरा सांभाळणारा संकर्षण हा ऑलराऊंडर आहे. पण फक्त याच क्षेत्रात नव्हे तर अडी-अडचणीला धावून येण्यातही तो तत्पर असतो. अशीच एक अडचण समोर आल्याने तो डायरेक्ट बस ड्रायव्हरची भूमिका साकारायला पुढे आला… तेही खरीखुरी बस हो… खोटी नव्हे काही…. आता हे सर्व वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की झालं काय ? तर झालं असं की….
ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी यासंदर्भातील एक पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे चक्क बस चालवताना दिसतोय. पण असं का, तर त्याचं उत्तरही या पोस्टमध्येच लपलं आहे. खरंतर नाटकाच्या प्रयोगावरून परत येताना बस चालकाला बरं वाटतं नव्हतं. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. अशावेळी संकर्षण कऱ्हाडे याने चालकाला मागे झोपवलं आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस चालवली. मुख्य म्हणजे त्याच्याकडे हेवी व्हेईकलचा लायसन्सही आहे.
प्रशांत दामले यांनी संकर्षणचा व्हिडीओ पोस्ट करत त्याचे कौतुक केले आहे. काय म्हणाले प्रशांत दामले, वाचूया..
प्रशांत दामले यांची पोस्ट काय ?
प्रशांत दामले यांनी फेसबूकवर लिहीलेली पोस्ट त्यांच्याच शब्दांत..
काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बर वाटेनासं झालं. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर !