हॉटेल रुमचं दार उघडं ठेवून अभिनेत्री गाढ झोपेत; लाखोंचं सामान चोरीला
अभिनेत्री गाढ झोपेत असताना हॉटेलच्या रुममध्ये घुसले चोर; 25 लाखांची चोरी
उत्तरप्रदेश: भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबेचं लाखो रुपयांचं सामान अयोध्येतील एका हॉटेलमधून चोरीला गेलं होतं. आता हे सामान पोलिसांना सापडलं आहे. अयोध्या पोलिसांसोबत पत्रकार परिषद घेत आम्रपालीने प्रशासन आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त आम्रपाली अयोध्येतील एका हॉटेलमध्ये थांबली होती. याच हॉटेलमधून तिचं सामान चोरीला गेलं होतं. यामध्ये पैसे, मोबाइल, दागिने यांचा समावेश होता.
पोलिसांनी चोरीच्या या प्रकरणी एका बापलेकाच्या जोडीला अटक केली आहे. या दोघांकडूनच चोरीचं सामान परत मिळवलं गेलंय. हे दोघं एका ऑटोने संबंधित हॉटेलमध्ये आले. हॉटेलमध्ये त्यांनी काही रुम्सचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला. योगायोगाने त्यावेळी आम्रपालीच्या रुमचा दरवाजा उघडाच होता आणि ती झोपली होती.
याच परिस्थितीचा फायदा घेत चोरांनी तिचं सामान चोरलं. आम्रपाली जेव्हा झोपेतून उठली तेव्हा तिला चोरीच्या घटनेबद्दल समजलं. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अखेर तिला तिचं सर्व सामान परत मिळालं आहे.
पत्रकार परिषदेत आम्रपाली म्हणाली, “जागी झाल्यावर जेव्हा मी माझा मोबाइल फोन शोधायला गेली, तेव्हा ते तिथे नव्हतं. माझं पाकिट पण सापडत नव्हतं. लगेच घाबरून मी रिसेप्शनला याविषयी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तेव्हा त्यांना चोरांविषयी समजलं. 24 तासांत मला माझं सामान परत मिळालं. माझी एकही वस्तू इकडची तिकडे झाली नव्हती. मी उत्तरप्रदेश पोलीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानते.”
आम्रपालीचं हे सर्व सामान जवळपास 22 ते 25 लाख रुपयांचं होतं. आम्रपालीने हॉटेलच्या रुमचा दरवाजा उघडा का ठेवला होता याचंही कारण सांगितलं. “माझ्या बाजूच्याच रुममध्ये वडील होते. मी त्यांना औषध देऊन माझ्या रुममध्ये आली होती. तेव्हा दरवाजा लॉक करायला विसरली. इथेच मी चुकले”, असं ती म्हणाली.