सर्वाइकल कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिनेत्रीची पूनम पांडेवर संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली..
डॉलीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिने 'भाभी' आणि 'कलश' या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर तिने 'मेरी आशिकी तुमसे ही' आणि 'खूप लडी मर्दानी.. झांसी वाली रानी' या मालिकांतून कमबॅक केलं. देवों के देव महादेव, एक था राजा एक थी रानी यांसारख्या मालिकांमध्येही तिने काम केलं होतं.
मुंबई : 5 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री हिबा नवाब आणि कृषाल अहुजा यांच्या ‘झनक’ या मालिकेत अभिनेत्री डॉली सोही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होती. मात्र डॉली सोहीने आता ही मालिका सोडली आहे. यामागचं कारण म्हणजे डॉली सर्वाइकल कॅन्सरने ग्रस्त आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला कॅन्सरचं निदान झालं. उपचार आणि काम या दोन्ही गोष्टी ती गेल्या काही महिन्यांपासून सांभाळत होती. मात्र आता पूर्णपणे आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने मालिका सोडल्याचं कळतंय. सध्या डॉलीवर किमोथेरपी सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डॉलीने सांगितलं, “मालिकेत काम करणं आता माझ्यासाठी शक्य नाही. म्हणूनच मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.”
आपल्या प्रकृतीविषयी सांगताना डॉलीने सांगितलं की रेडिएशनमुळे तिला खूप त्रास होत आहे आणि याच कारणामुळे ती शूटिंगकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाही. मात्र तब्येत बरी झाल्यानंतर ती पुन्हा एकदा सेटवर परतणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वाइकल कॅन्सरची जोरदार चर्चा सुरू आहे. यामागचं कारण म्हणजे अभिनेत्री पूनम पांडेनं स्वत:च्या मृत्यूविषयी पसरवलेली अफवा. सर्वाइकल कॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी पूनम पांडेनं स्वत:च्याच निधनाची अफवा पसरवली होती. त्यावरही डॉलीने संताप व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
“आजारपण, उपचार आणि त्यामुळे होणारा शारीरिक-मानसिक त्रास यांमुळे मी सध्या खूप भावूक झाली आहे. पूनम पांडेसारख्या लोकांमुळे मला कधीही रडू कोसळतं. तिने सर्वाइकल कॅन्सरची खिल्ली उडवली आहे. प्रसिद्धी किंवा जागरुकता मोहिमेचा हा योग्य मार्ग असूच शकत नाही. जे लोक अशा प्रकारच्या कॅन्सरशी झुंज देत आहेत, त्यांना ही गोष्ट पचवणंच खूप कठीण आहे. पूनमच्या निधनाबद्दल वाचलं तेव्हा माझ्या पायाखालची जमिनच सरकली होती”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.