मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा सध्या यशाच्या शिखरावर आहे. भारतात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार करणारा हा महिलाप्रधान भूमिका असलेला पहिला चित्रपट ठरला आहे. आता 300 कोटींकडे या चित्रपटाची वाटचाल सुरू आहे. कारण जगभरात ‘द केरळ स्टोरी’ची कमाई आतापर्यंत जवळपास 260.5 कोटी रुपये इतकी झाली आहे. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं धर्मांतर केल्यानंतर त्यांना कथित ISIS दहशतवादी संघटनेत सामील करून घेतलं गेलं, अशी कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘इस्लामोफोबिक’ असल्याची टीका होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अदा शर्मा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अदाने एका मुस्लीम तरुणीची कथा सांगितली. चित्रपट पाहिल्यानंतर कशा पद्धतीने तिच्या विचारांमध्ये बदल झाला, त्याबद्दल तिने सांगितलं. ती म्हणाली, “चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एका मुस्लीम मुलीने दिग्दर्शकांना मेसेज केला होता. तुम्ही अशा पद्धतीचं इस्लामोफोबिक चित्रपट कसा बनवू शकता, असा सवाल करत ती दररोज त्यांना वाईट मेसेज करायची. पण तिने जेव्हा आमचा चित्रपट पाहिला, तेव्हा तिची प्रतिक्रिया पूर्ण वेगळी होती. काही लोक इस्लामचा कशा पद्धतीने गैरवापर करत आहेत, हे तुम्ही खऱ्या अर्थाने चित्रपटात दाखवलं. तुम्ही आमच्या धर्माची सेवा केली आहे. कारण आमचा धर्म कसा नाही हे तुम्ही लोकांना सांगत आहात, असा मेसेज तिने दिग्दर्शकांना केला होता.”
अदा शर्मा पुढे म्हणाली, “मला वाटत नाही की जगातील कोणताही धर्म किंवा संत तुम्हाला असं करण्यास सांगणार नाही जे मानवतेला हानिकारक असेल. दुसऱ्याचा जीव घेणाऱ्या लोकांमध्ये काहीतरी चुकीचं नक्कीच असेल. मी खुश आहे की मी अशा देशात राहते, जिथे मला माझी मतं मांडण्याचं स्वातंत्र्य आणि भाषणस्वातंत्र्य आहे. मतस्वातंत्र्य असल्याबद्दल तुमचा कोणी इथे शिरच्छेद करत नाही. मी लिपस्टिक लावू शकते आणि त्यामुळे माझे हात कापले जात नाहीत. माझी फक्त एकच विनंती आहे की लोकांनी आधी हा चित्रपट पहावा आणि त्यानंतर मत मांडावं. याचीही माझ्या देशात परवानगी आहे.”
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बलानी, विजय कृष्ण, प्रणय पचौरी आणि प्रणव मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. सुदिप्तो सेन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून विपुल शाह त्याचे निर्माते आहेत.