मुंबई : सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून अजूनही वाद सुरूच आहे. हा चित्रपट प्रचारकी असल्याची टीका काहीजण करत आहेत. तर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कथेचा सत्याशी काहीच संबंध नसल्याचंही काहीजण म्हणत आहेत. यामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर सोशल मीडियाद्वारे निशाणा साधला जात आहे. त्यावर आता अदा शर्माने सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रचारकी असल्याची टीका करणाऱ्यांना अदा शर्माने गुगलवर दोन शब्द सर्च करण्याचा सल्ला दिला आहे.
‘आणि जे काही लोक ‘द केरळ स्टोरी’ला अजूनही प्रचारकी चित्रपट असं म्हणत आहेत, अनेक भारतीय पीडितांकडून घटना ऐकूनही असं काही घडलंच नाही असं म्हणत आहेत.. त्यांना माझी नम्र विनंती आहे की गुगलवर फक्त दोन शब्द सर्च करावेत. ISIS आणि ब्राइड्स हे दोन शब्द गुगलवर सर्च करा, कदाचित गोऱ्या मुलींच्या अकाऊंटवर सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटतील आणि आपला भारतीय चित्रपट खरा आहे याची प्रचिती येईल’, असं तिने लिहिलं आहे.
And for the the few still calling #TheKeralaStory a propaganda film ,saying these incidents do not exist even after watching testimonials of several Indian victims,,,my humble request , Google two words ISIS and Brides…maybe an account of white girls narrated to you might make… pic.twitter.com/qYBp3B3owQ
— Adah Sharma (@adah_sharma) May 6, 2023
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अवघ्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं पहायला मिळालं. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
अभिनेत्री कंगना रनौतनेही ‘द केरळ स्टोरी’वरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘या चित्रपटावर बंदी आणू शकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय. या चित्रपटात फक्त ISIS सोडून इतर कोणालाच चुकीचं दाखवलं गेलं नाही असं मला वाटतं. जर या देशातील सर्वांत जबाबदार व्यवस्था म्हणजेच हायकोर्ट चित्रपटाच्या बंदीविरोधात असेल, तर ते योग्यच असतील. ISIS ही दहशतवादी संघटना आहे. फक्त मीच त्यांना दहशतवादी म्हणतेय असं नाही तर आपला देश, गृह मंत्रालय आणि इतर देशांनीही त्यांना दहशतवादी म्हटलंय. जर तुम्हाला ती दहशतवादी संघटना वाटत नसेल तर तुम्हीदेखील दहशतवादी आहात’, असं कंगना म्हणाली.