Adipurush: ‘आदिपुरुष’मधील रावण खिल्जीसारखा वाटत असेल तर लेखकाची ‘ही’ मुलाखत वाचाच!
"रावण हा खिल्जीसारखा दिसत असेल तर.."; मनोज मुंतशिर यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
मुंबई- ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून त्यातील भूमिकांवर प्रेक्षक आक्षेप नोंदवत आहेत. रावण, हनुमान यांसारख्या पौराणिक कथेतील भूमिकांना मॉडर्न अंदाजात दाखवल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. टीझरमध्ये दाखवण्यात आलेला रावण हा अल्लाउद्दीन खिल्जीसारखा वाटत असल्याचं अनेकांनी म्हटलंय. त्यावरून आता प्रसिद्ध संवादलेखक मनोज मुंतशिर (Manoj Muntashir) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांची बाजू घेत त्यांनी चित्रपटाच्या काही सकारात्मक पैलू समोर आणल्या आहेत.
काय म्हणाले मनोज मुंतशिर?
“आपण 1 मिनिट 35 सेकंदांचा टीझर पाहिला आहे. त्यामध्ये स्पष्ट पहायला मिळतंय की रावणाने त्रिपुंड टिळा लावला आहे. कोणता खिल्जी कपाळावर त्रिपुंड टिळा लावतो आणि रुद्राक्ष धारण करतो? दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक युगातील वाईटाचा एक वेगळा चेहरा असतो. रावण हा माझ्यासाठी वाईटाचा चेहरा आहे. अल्लाउद्दीन खिल्जीसुद्धा वाईट प्रवृत्तीचा चेहरा आहे. चित्रपटात हे जाणूनबुजून केलं गेलं नाही, पण जर या दोघांचा चेहरा मिळताजुळता जरी असला तरी त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही. रावण आणि खिल्जी हे दोन्ही नायक नव्हेत”, असं मुंतशिर म्हणाले.
ओम राऊत यांची बाजू घेताना ते पुढे म्हणाले, “तुम्ही या चित्रपटाशी कोणती व्यक्ती जोडलेली आहे ते तर पहा. चित्रपटात जेव्हा सीतेचं हरण होतं, तेव्हा रावणाने स्पर्शसुद्धा केला नाही. कारण शूटिंगदरम्यान मी ओम राऊत यांना हे म्हणताना ऐकलंय की सीता आपली आई आहे. त्यांना कोणीच स्पर्श करू शकत नाही.”
या चित्रपटामागचा नेमका उद्देश आणि भावना समजल्यानंतर लोक आम्हाला नक्कीच पाठिंबा देतील, असं देखील ते म्हणाले. आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे.