Adipurush | तिरुपती मंदिरासमोर ओम राऊत – क्रिती सनॉन यांच्या ‘गुडबाय किस’वरून वाद; पहा व्हिडीओ
'आदिपुरुष' हा चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी आधीच सोशल मीडियावर गाजत आहेत. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने तगडी कमाई केल्याची माहिती समोर येत आहे.
आंध्रप्रदेश : सध्या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘आदिपुरुष’. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओम राऊत यांच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रामायणाची कथा एका नव्या अंदाजात या चित्रपटातून सांगण्यात येणार आहे. यामध्ये ‘बाहुबली’ स्टार प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सनी सिंगने लक्ष्मण, सैफ अली खानने लंकेश आणि देवदत्त नागेनं हनुमानाची भूमिका साकारली आहे. मंगळवारी आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिराजवळ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चाहत्यांच्या तुफान गर्दीत हा ट्रेलर लाँच केल्यानंतर बुधवारी क्रिती आणि ओम राऊत यांनी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन देवदर्शन केलं. मात्र देवदर्शनानंतरच्या एका व्हिडीओवरून नवीन वाद समोर आला आहे.
बुधवारी सकाळी क्रिती सनॉन आणि ओम राऊत यांनी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन श्री व्यंकटेश्वर यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तिथून निघताना ओम राऊत यांनी क्रितीच्या गालावर हलका ‘किस’ केला. याच गुडबाय किसवरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे.
ओम राऊत आणि क्रितीच्या या व्हिडीओवर भाजपचे प्रदेश सचिव रमेश नायडू नागोथू यांनी टिप्पणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेषकरून मंदिराजवळ अशा पद्धतीने जाहीर वागणुकीची गरज होती का, असा सवाल त्यांनी केला. ‘तिरुमलामधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासमोर अशा पद्धतीने किस करणे, मिठी मारणे हे अत्यंत अपमानास्पद आणि अस्वीकार्य आहे’, असं त्यांनी म्हटलंय. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केलं. तोपर्यंत त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Actress #KritiSanon and Director #OmRaut visited #Tirumala this morning to seek blessings.#Adipurush #AdipurushOnJune16th#ShreyasMedia #ShreyasGroup pic.twitter.com/qXs4IJGqni
— Shreyas Media (@shreyasgroup) June 7, 2023
यावर अद्याप ओम राऊत किंवा क्रिती सनॉनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी आधीच सोशल मीडियावर गाजत आहेत. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने तगडी कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. आदिपुरुष हा चित्रपट तब्बल 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र टीझरवर आलेल्या प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पाच ते सहा महिन्यांची मुदत वाढवून घेतली.