Adipurush: टीकांनंतर ‘आदिपुरुष’साठी ओम राऊतने घेतला मोठा निर्णय
'आदिपुरुष'मध्ये होणार मोठे बदल; ओम राऊतने दिली महत्त्वपूर्ण माहिती
मुंबई- ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. त्यानंतर आता चित्रपटाच्या टीमने व्हिएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द दिग्दर्शक ओम राऊतने याविषयीची माहिती दिली. यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पाच महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे.
आदिपुरुष हा चित्रपट आता 12 जानेवारी 2023 रोजी नाही तर 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायण या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये प्रभासने राम, क्रितीने सीता आणि सैफने रावणाची भूमिका साकारली आहे.
‘जय श्री राम, आदिपुरुष हा केवळ चित्रपट नाही तर प्रभू श्री राम यांच्याप्रती असलेली आमची श्रद्धा आणि आपल्या संस्कृती, इतिहासाप्रती असलेली वचनबद्धता आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचा चांगला अनुभव देता यावा यासाठी आम्हाला चित्रपटावर आणखी काम करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. देशाला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. तुमचं प्रेम, तुमची साथ मिळाली तर यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. आदिपुरुष आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे’, असं ट्विट ओम राऊतने केलं.
जय श्री राम…#Adipurush releases IN THEATRES on June 16, 2023.#Prabhas #SaifAliKhan @kritisanon @mesunnysingh #BhushanKumar #KrishanKumar @vfxwaala @rajeshnair06 #ShivChanana @manojmuntashir @TSeries @RETROPHILES1 @UV_Creations @Offladipurush pic.twitter.com/kXNnjlEsib
— Om Raut (@omraut) November 7, 2022
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून निर्मात्यांना खूप टीकांचा सामना करावा लागला. यातील राम आणि रावण यांच्या लूकवरही बरेच प्रश्न उपस्थित केले गेले.
याआधी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ओम राऊत म्हणाले, “आपण फक्त 95 सेकंदांचा टीझर पाहिला आहे. आम्ही सर्व टिप्पणींची नोंद करत आहोत. कोणाचीच निराशा होणार नाही याचं आश्वासन आम्ही देतो.”