Adipurush | ‘आदिपुरुष’मधील संजीवनी बूटीच्या सीनवर उत्तर देण्यास लेखकांचा नकार; म्हणाले..
'आदिपुरुष'मधील काही डायलॉग्सवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला असून आठवडाभराच्या कालावधीत हे डायलॉग्स बदलण्यात येणार आहेत. मनोज मुंतशीर यांनी रविवारी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली होती. याच ट्विटमध्ये त्यांनी टीकाकारांवर नाराजी व्यक्त केली होती.
मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लेखक मनोज मुंतशीर यांनी कथा आणि पटकथालेखनाबद्दलचे प्रश्न दिग्दर्शक ओम राऊत यांना विचारण्यास सांगितलं आहे. चित्रपटात विभीषणची पत्नी संजीवनी बूटीबद्दल माहिती देताना दाखवण्यात आलं आहे. यावरून प्रश्न विचारला असता मुंतशीर म्हणाले, “कथा आणि संवादांचा हाच संबंध आहे. संवाद हे कथेसाठी लिहिलेले असतात आणि कथेशिवाय संवादांचा काही उद्देश नसतो.”
“आमची कथा फक्त रामायणाशी प्रेरित आहे. आमच्या चित्रपटाचं शीर्षकच आदिपुरुष आहे. रामायणातील युद्धकांड या एका भागातून हे नाव घेण्यात आलं आहे. आम्ही संपूर्ण रामायण दाखवलं नाही. जेव्हा आपण आदिपुरुषबद्दल बोलतो, जी कथा रामायणापासून प्रेरित आहे, तेव्हा रुपांतरित पटकथा आणि कथेबद्दल माझ्याकडे कोणतेही प्रश्न उपस्थित होऊ नयेत. फक्त प्रश्न उरतात ते संवादांचे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि मी आधीच जाहीर केलं आहे की तुम्हाला न आवडलेले संवाद बदलले जातील”, असं ते पुढे म्हणाले.
संजीवनी बूटीच्या सीनबद्दल विचारला प्रश्न
या मुलाखतीत मुंतशीर यांना संजीवनी बूटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. विभीषणची पत्नी संजीवनी बूटीद्वारे लक्ष्मणाचे प्राण वाचवते, या दृश्याची प्रेरणा कुठून मिळाली, असं त्यांना विचारण्यात येतं. त्यावर मुंतशीर म्हणाले, “आम्ही श्रेयनामावलीत हे स्पष्ट नमूद केलं आहे की मी चित्रपटासाठी फक्त संवाद आणि गाण्याचे बोल लिहिले आहेत. ओम राऊत तुमच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं देऊ शकतील.”
“तुम्ही डायलॉग्स अर्थपूर्ण आहेत की नाही हे तपासल्याशिवाय लिहिणार का”, असा सवाल केला असता मुंतशीर यांनी उत्तर दिलं, “हे टीमवर्क आहे आणि ओम राऊत यांच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवला. ओम राऊत यांनी कथेचा अभ्यास केला असून त्यांच्याकडे सर्व संदर्भ नक्कीच असतील.”
‘आदिपुरुष’चे डायलॉग्स बदलणार
‘आदिपुरुष’मधील काही डायलॉग्सवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला असून आठवडाभराच्या कालावधीत हे डायलॉग्स बदलण्यात येणार आहेत. मनोज मुंतशीर यांनी रविवारी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली होती. याच ट्विटमध्ये त्यांनी टीकाकारांवर नाराजी व्यक्त केली होती. ‘रामकथेतून पहिला धडा मिळतो तो म्हणजे प्रत्येक भावनेचा आदर करणे. योग्य-अयोग्य हे काळानुसार बदलतं, मात्र भावना तशीच राहते. आदिपुरुषमधील 4000 हून अधिक ओळींचे संवाद मी लिहिले आहेत. त्यापैकी पाच ओळींवरून काहींच्या भावना दुखावल्या आहेत. त्या शेकडो ओळींमध्ये जिथे श्रीरामाचा महिमा होता, माँ सीतेच्या पावित्र्याचं वर्णन होतं, त्यासाठी प्रशंसासुद्धा मिळाली पाहिजे होती. मात्र ते का मिळालं नाही माहीत नाही. माझ्याच भावंडांनी सोशल मीडियावर माझ्यासाठी असभ्य शब्द लिहिले’, अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली.