Natu Natu: RRR चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर भडकला अदनान सामी; म्हणाला ‘हीच वृत्ती..’
RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याने जिंकला गोल्डन ग्लोब पुरस्कार; शुभेच्छा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर अदनान सामीने 'या' कारणासाठी व्यक्त केली नाराजी
मुंबई: हॉलिवूडचा प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकून RRR या चित्रपटाने जगभरात भारताची मान उंचावली. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकणारा RRR हा आशियातील पहिला चित्रपट ठरला. या यशाबद्दल सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनीसुद्धा ट्विट करत चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांच्या या ट्विटवर गायक अदनान सामीने जाहीर नाराजी व्यक्त केली.
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विट –
‘तेलुगू झेंडा उंच फडकतोय. आंध्र प्रदेशातील प्रत्येक व्यक्तीतर्फे RRR च्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे,’ असं ट्विट रेड्डी यांनी केलं.
अदनान सामीने व्यक्त केली नाराजी
रेड्डी यांच्या या ट्विटवर गायक अदनान सामीने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘तेलुगू झेंडा? तुमचा अर्थ भारताचा झेंडा ना? आपण सर्वजण सर्वात आधी भारतीय आहोत आणि त्यामुळे संपूर्ण देशापासून तुम्हाला वेगळं ठरवणं थांबवा. विशेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर.. आपला देश एकच आहे. ही अलिप्ततावादी वृत्ती फार अस्वस्थ करणारी आहे, जी आपण आधीच 1947 मध्ये अनुभवली आहे,’ अशा शब्दात अदनानने नाराजी बोलून दाखवली.
Telugu flag? You mean INDIAN flag right? We are Indians first & so kindly stop separating yourself from the rest of the country…Especially internationally, we are one country! This ‘separatist’ attitude is highly unhealthy as we saw in 1947!!! Thank you…Jai HIND!?? https://t.co/rE7Ilmcdzb
— Adnan Sami (@AdnanSamiLive) January 11, 2023
जर तेलुगू सिनेमाने संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावली असं लिहिलं असतं तर ते योग्य असतं कारण ते सत्य आहे, असंही त्याने पुढे लिहिलं. अदनान सामीच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी RRR या चित्रपटाला दोन नामांकने मिळाली होती. सर्वोत्कृष्ट मूळ गाणं आणि सर्वोत्कृष्ट नॉन इंग्लिश लँग्वेज विभागात RRR ला नामांकनं मिळाली होती. त्यापैकी एका विभागात नाटू नाटू या गाण्याने बाजी मारली.