मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. यानिमित्ताने राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा तो पहिला तेलुगू अभिनेता ठरला. अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला. पण फार क्वचित लोकांना हे माहीत असेल की पुष्पा या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अल्लू अर्जुन हा दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हता. तर महेश बाबूने ही भूमिका साकारावी अशी दिग्दर्शकांची इच्छा होती. आता अल्लू अर्जुनने त्याच चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर महेश बाबूचं जुनं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या जुन्या ट्विटमध्ये महेश बाबूने तो चित्रपट सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. 4 मार्च 2019 रोजी महेश बाबूने हे ट्विट केलं होतं. त्यात त्याने लिहिलं होतं, ‘काही क्रिएटिव्ह मतभेदांमुळे मी सुकुमारसोबत माझा चित्रपट करत नाहीये. त्याच्या या नवीन प्रोजेक्टसाठी मी त्याला शुभेच्छा देतो. चित्रपट बनवणाऱ्यांसाठी माझ्या मनात खूप आदर आहे. ‘नेनोक्कोडिने’ हा चित्रपट नेहमीच क्लासिक म्हणून राहील. त्या चित्रपटात काम करताना मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला.’ महेश बाबूचं हे ट्विट आता व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
Due to creative differences, my film with Sukumar is not happening. I wish him all the best on the announcement of his new project. Respect always for a film maker par exellence. 1 Nenokkadine will remain as a cult classic. Enjoyed every moment working on that film.
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) March 4, 2019
अल्लू अर्जुनशिवाय दुसरा कोणताच अभिनेता पुष्पाची भूमिका उत्तमरित्या साकारू शकला नसला, असं मत नेटकरी नोंदवत आहेत. ‘महेश बाबू मुख्य अभिनेता असता, तर तो चित्रपट चालला असता की नाही याची खात्री नाही. पुष्पा हा चित्रपट अल्लू अर्जुनमुळेच इतका ब्लॉकबस्टर ठरला आहे. दुसरा कोणताच अभिनेता त्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकला असता’, असं एकाने लिहिलं. तर ‘कदाचित ती भूमिका अल्लू अर्जुनसाठीच होती. म्हणून जे घडलं ते चांगलंच घडलं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
अल्लू अर्जुनशिवाय देवी श्रीप्रसाद यांनाही ‘पुष्पा : द राईज’मधील संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रीवल्ली, ऊ अंटावा, सामी सामी ही या चित्रपटातील गाणी तुफान गाजली. आजही त्या गाण्यांची तुफान क्रेझ पहायला मिळते.