मुंबई : 13 डिसेंबर 2023 | अभिनेत्री तृप्ती डिमरीसाठी ‘ॲनिमल’ हा चित्रपट फारच लकी ठरला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटातील भूमिकेनंतर तृप्तीला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळत आहेत. नेटकरी तिला ‘नॅशनल क्रश’, ‘भाभी नंबर 2’ म्हणत आहेत. ‘ॲनिमल’ या चित्रपटात तृप्तीने अभिनेता रणबीर कपूरसोबत काही न्यूड आणि इंटिमेट सीन्स केले आहेत. याच सीन्समुळे तृप्तीची जोरदार चर्चा आहे. ‘ॲनिमल’साठी मिळणाऱ्या लोकप्रियतेचा आस्वाद घेत असतानाच आता तृप्तीचे अभिनेता विकी कौशलसोबतचेही काही सीन्स सोशल मीडियावर लीक झाले आहेत. आगामी ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ या चित्रपटात ती विकीसोबत काम करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
आनंद तिवारी यांच्या ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ या चित्रपटात तृप्ती आणि विकी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ‘ॲनिमल’ या चित्रपटापूर्वीच दोघांनी एकत्र शूटिंग केली होती. त्याचे फोटो आता सोशल मीडियावर लीक झाले आहेत. 2022 मध्ये विकी आणि तृप्तीने क्रोआशिया याठिकाणी चित्रपटासाठी शूटिंग केलं होतं. एका रोमँटिक गाण्याची शूटिंग याठिकाणी झाली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये तृप्ती आणि विकीची रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळतेय. या चित्रपटात तृप्ती आणि विकीसोबतच ॲमी वर्क आणि नेहा धुपिया यांच्याही भूमिका आहेत.
‘ॲनिमल’ हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईच करत नाहीये, तर सोशल मीडियावरही हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्सवरून सोशल मीडियावर विविध मतमतांतरे मांडली जात आहेत. चित्रपटातील तृप्ती डिमरीच्या भूमिकेची एक वेगळीच क्रेझ पहायला मिळतेय. ‘ॲनिमल’मध्ये रणबीरसोबत तृप्तीने न्यूड आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. याच सीन्समुळे ती प्रकाशझोतात आली आहे.
एका मुलाखतीत तृप्तीने ‘ॲनिमल’मधील तिच्या भूमिकेबद्दल आईवडिलांच्या प्रतिक्रियेचा खुलासा केला होता. “माझ्या आईवडिलांना जरा धक्का बसला. ते मला म्हणाले, आम्ही चित्रपटांमध्ये असं काही पाहिलं नव्हतं आणि तू सुद्धा अशी कोणती भूमिका साकारली नव्हतीस. त्या सीन्सच्या विचारांतून बाहेर पडण्यास त्यांना थोडा वेळ लागला. पण त्यांनी मला समजून घेतलं. ते म्हणाले की तू हे सीन्स करायला पाहिजे नव्हतं, पण ठीके. पालक म्हणून आम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे”, असं तिने सांगितलं होतं.