सलमानच्या घराला 100 पोलिसांचा गराडा, पहिल्यांदाच सिनेकलाकाराला मोठी सुरक्षा; काही पोलीस तर…
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या 'गॅलेक्सी' अपार्टमेंट्सबाहेर पोलिसांची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. काही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये परिसरात तैनात आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुख्यात लॉरेन्स बिष्णोईकडून या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली. ‘जो कोणी सलमान खान आणि दाऊद यांची मदत करणार, त्याने आपला हिशोब तयार ठेवावा’, अशी धमकी बिष्णोईकडून फेसबुकवरील पोस्टद्वारे देण्यात आली. यानंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी जवळपास 100 मुंबई पोलिसचे जवान तैनात आहेत. ज्यामध्ये काही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्येही आहेत. वांद्रे इथल्या सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर 24 तास पोलिसांचा पहारा असणार आहे. सीसीटीव्हीच्या मदतीनेही सुरक्षेवर कडक नजर ठेवली जात आहे.
बँडस्टँड आणि गॅलेक्सी अपार्टमेंट्सजवळ 60 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी सामान्य कपड्यांमध्ये तैनात आहेत. या भागात कोणतीही संशयास्पद घटना किंवा व्यक्ती आढळते का, यावर त्यांचं लक्ष आहे. परिसरात सतत दक्ष राहण्यासाठी हे अधिकारी एसओपींचं पालन करत आहेत. याशिवाय मुंबई पोलिसांनी फेशिअल रेकग्निशन (चेहऱ्याची ओळख) तंत्रज्ञानासह AI सक्षम हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेरे वापरले आहेत. एखादी व्यक्ती वारंवार एकाच ठिकाणी आढळून आल्यास पोलीस अधिकाऱ्यांना सावध करण्यासाठी हे कॅमेरे डिझाइन केलेले आहेत.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Security enhanced outside Galaxy apartments, the residence of actor Salman Khan pic.twitter.com/24OMi9OI1i
— ANI (@ANI) October 14, 2024
गॅलेक्सी अपार्टमेंट्समध्ये जाणाऱ्यांची सुरक्षेची संपूर्ण तपासणी होत असून त्यांचे सर्व ओळखपत्रही तपासले जात आहेत. त्यांच्या ओळखपत्रांची पडताळणी आणि नोंदणी केल्यानंतरच त्यांना इमारतीत सोडण्यात येत आहे. गॅलेक्सी अपार्टमेंट्स कॉम्प्लेकच्या बाहेर अनधिकृत व्यक्ती आणि चाहत्यांना जमण्यास मनाई आहे. सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यामध्ये आठ ते दहा सशक्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असतो. सलमानला कुठेही जायचं असल्यास स्थानिक पोलीस ठाण्याशी समन्वय साधून तो परिसर आधी सुरक्षित केला जातो.
याआधीही सलमानला लॉरेन्स बिष्णोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आता सलमानच्या अत्यंत जवळचे असणारे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्याच्या सुरक्षेविषयी अधिक काळजी घेतली जात आहे.