Haryana Violence | ‘कुटुंबीयांच्या रक्षणासाठी मुस्लिमांनी हिंदू धर्म स्वीकारावा..’; हरियाणातील हिंसाचारावर अभिनेत्याचं ट्विट चर्चेत
हरियाणामधील हिंसाचारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा हिंसाचार म्हणजे व्यापक कटाचा भाग असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला.
मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : हरियाणामध्ये गुरुवारी सलग चौथ्या दिवशी तणाव कायम होता. गुरुग्राममध्ये बुधवारी संध्याकाळी 25 ते 30 जणांच्या जमावाने दोन बंगाली मुस्लीम स्थलांतरितांना मारहाण केल्याची घटना समोर आली. तर नुह इथं एका मशिदीला आग लावण्यात आली. या हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 176 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसंच गुरुवारपर्यंत 93 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. हरियाणामधील हिंसाचारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तर सुरूच आहेत. मात्र त्याचसोबत कलाविश्वातूनही विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यादरम्यान एका अभिनेत्याने केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. या अभिनेत्याने मुस्लीम समुदायाला सल्ला दिला आहे.
‘मी भारतातील सर्व मुस्लिमांना सुचवू इच्छितो की धर्मांतर करून हिंदू बनणं हा चांगला पर्याय आहे, कारण धर्मापेक्षा आपल्या कुटुंबीयांचा आणि मुलांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. आपण भारतीय मुस्लिमांनी अरबांसाठी धर्मांतर केलं आणि आता अरब देश इस्लामचं रक्षण करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे आपलं कुटुंब वाचवण्यासाठी पुन्हा धर्मांतर करण्यात काहीच गैर नाही’, असं ट्विट या अभिनेत्याने केलं आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल आर. खान आहे.
I would like to suggest to all the Muslims in India that better to convert n become Hindu coz life of ur family n children are more important than religion. We Indian Muslims converted for Arabs n Arab countries are not ready to protect Islam. So there is nothing wrong to convert…
— KRK (@kamaalrkhan) August 3, 2023
आणखी एका ट्विटमध्ये केआरकेनं पुढे लिहिलंय, ‘मी फक्त इतकंच म्हणतोय की भारतीय मुस्लिमांनी अरबांना का फॉलो करावं, जेव्हा ते त्यांच्या समर्थनासाठी एक शब्दही बोलू शकत नाहीत. जर आखाती देशांना हवं असले तर भारत सरकार 24 तासांत सर्वकाही थांबवेल. सुमारे 5 दशलक्ष हिंदू आखाती देशांमध्ये राहतात आणि अदानी, माल्या, सहारा यांच्यासारखे मोठे लोक राहतात.’
I am just saying that why should Indian Muslims follow Arabs, when they can’t say a word to support them. If gulf countries want then Indian govt will stop everything within 24 hours. Approx 5 millions Hindu are living in gulf countries and all big ppl like Adani, Mallya, Sahara.
— KRK (@kamaalrkhan) August 3, 2023
केआरकेच्या या ट्विटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘तुम्ही भारतीय आहात, धर्माचा विषय नंतर येतो. माणुसकी आणि बंधुभाव महत्त्वाचा आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आम्ही फक्त अल्लाहकडून मदत मागतो’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. हरियाणामधील हिंसाचारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा हिंसाचार म्हणजे व्यापक कटाचा भाग असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला. जमायत उलेमा-ए-हिंद या संघटनेनं महाराष्ट्रात सोमवारी रेल्वेमध्ये घडलेलं हत्याकांड आणि हरियाणा हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.