राजू श्रीवास्तवनंतर ‘या’ प्रसिद्ध कॉमेडियनचं निधन; सुनील पालने पोस्ट केला Video
"कॉमेडी विश्वाला कोणाची नजर लागली काय माहीत"; सुनील पाल झाले भावूक
मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आता आणखी एका प्रतिभावान कॉमेडियनचं (Comedian) निधन झालं आहे. गुजरातचे प्रसिद्ध कॉमेडियन पराग कनसारा (Parag Kansara) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकल नाही. कॉमेडियन आणि अभिनेते सुनील पाल (Sunil Pal) यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सुनील पाल भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे.
“कॉमेडी विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पराग कनसाराजी, आमचे लाफ्टर चॅलेंजचे पार्टनर आता आपल्यात नाहीत. प्रत्येक गोष्टीचा विरुद्ध विचार करत ते आम्हाला हसवायचे. पराग भैय्या यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. कॉमेडी विश्वाला कोणाची नजर लागली काय माहीत? काही दिवसांपूर्वीच आम्ही राजू भाईला गमावलं. एकानंतर एक कॉमेडीच्या खंबीर स्तंभांना आपण गमावत आहोत”, अशा शब्दांत सुनील पाल व्यक्त झाले. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘हप्पू की उल्टन पल्टन’ फेम अभिनेते दीपेश भान यांचीही आठवण काढली.
पराग कनसारा हे गुजरातमधील वडोदरामध्ये राहायचे. गेल्या काही काळापासून ते टीव्ही आणि कॉमेडीपासून दूर होते. स्टार वन वाहिनीवरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमध्ये ते स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या शोमुळे अनेक विनोदी कलाकारांना एक प्लॅटफॉर्म मिळाला. अनेकांना त्यातून ओळख आणि प्रसिद्धी मिळाली. याच शोमुळे पराग यांना प्रसिद्धी मिळाली.
पराग कनसारा हे ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. ते हा शो जिंकू शकले नव्हते. मात्र त्यांची कॉमेडी प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यांनी इतरही काही कॉमेडी शोमध्ये आपली कला सादर केली. 2011 मध्ये ट्रॅफिकचे नियम मोडल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.