कोलकाता: रविवारी दुपारी मनोरंजनविश्वातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली. बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्मा हिची 20 दिवसांपासूनची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. रविवारी 20 नोव्हेंबर रोजी अँड्रिलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. ती कोमामध्ये होती आणि तिची आर्थिक मदत करण्यासाठी प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगसुद्धा पुढे सरसावला होता.
अँड्रिला 24 वर्षांची होती. मल्टिपल कार्डिॲक अरेस्टमुळे 1 नोव्हेंबरपासून तिची प्रकृती चिंताजनक होती. हावडामधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.
अँड्रिलाने दोन वेळा कॅन्सरवर मात केली होती. मात्र हार्ट अटॅकशी तिची झुंज अपयशी ठरली. कॅन्सरवर मात केल्यानंतर अँड्रिलाने टीव्ही इंडस्ट्रीत पुनरागमन केलं होतं. आता अचानक तिच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अँड्रिला ही मुर्शिदाबाद इथली राहणारी आहे. 2007 मध्ये तिने ‘झुमर’ या टीव्ही शोमधून पदार्पण केलं. त्यानंतर तिने जियो काथी, जिबोन ज्योती यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. ‘भगर’ या वेब सीरिजमध्येही तिने भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर तिचा मोठा फॅन फॉलोईंग आहे.
अँड्रिलाचं अभिनयक्षेत्रात काम करण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप मेहतनदेखील घेतली. मात्र या प्रवासात तिला तिच्या आरोग्याची साथ मिळाली नाही. अँड्रिलाच्या निधनावर बंगाली कलाविश्वातून शोक व्यक्त होतोय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीसुद्धा अँड्रिलाच्या निधनावर शोक व्यक्त केला.