हे असलं भलतं-सलतं दाखवू नकोस..; फ्रीजमध्ये बसल्याने ऐश्वर्या नारकर ट्रोल
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये त्या फ्रीजमध्ये बसलेल्या दिसत आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. असं काही दाखवू नका, अशी विनंती काहींनी केली आहे.
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. एप्रिलनंतर मे महिन्यातही कमाल तापमानात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. उष्ण वातावरणातून सुटका व्हावी म्हणून उन्हाळ्यात एसीचा अधिकाधिक वापर होतो. याशिवाय थंडगार पेय किंवा शरीराला थंडावा देणारी फळं खाल्ली जातात. मात्र उन्हाळ्यात चक्क फ्रीजमध्ये जाऊन बसल्याचं कोणाला तुम्ही पाहिलंय का? होय, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ऐश्वर्या या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कधी सेटवरील धमाल मजामस्तीचे तर कधी पती अविनाश नारकर यांच्यासोबतच्या डान्सचे विविध व्हिडीओ ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. यामध्ये ऐश्वर्या नारकर या थेट फ्रीजमध्ये जाऊन बसल्याचं पहायला मिळत आहे.
ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेच्या सेटवर असलेल्या फ्रीजमध्ये जाऊन त्या बसल्या आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला राहुल मेहेंदळे या फ्रीजचा दरवाजा उघडतात. त्यानंतर आतमध्ये ऐश्वर्या बसल्याचं दिसतात. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी यावरून ऐश्वर्या यांना ट्रोल केलंय. ‘हे असलं भलतं सलतं दाखवू नकोस. कोणीतरी अनुकरण करून अडचणीत येऊ शकतो’, असं एकाने लिहिलं. त्यावर ऐश्वर्या यांनी उत्तर देत म्हटलंय, ‘मालिकेतला सीन आहे.’ तर दुसऱ्या युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं, ‘एखादं एसी घ्या ताई. पण असं फ्रीजमध्ये बसू नका. शॉक वगैरे लागू शकतो.’
View this post on Instagram
ऐश्वर्या नारकर यांचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्यांनी असं काही नेटकऱ्यांना दाखवू नये, असं अनेकांनी म्हटलंय. सेलिब्रिटींच्या अनेक गोष्टींचं अनुकरण केलं जातं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने असं अनुकरण केलं तर महागात पडू शकतं, म्हणून अनेकांनी कमेंट करत त्यांना असा व्हिडीओ पोस्ट न करण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी हा सीन मालिकेतील असल्याची टिप त्यावर लिहावी, असंही म्हटलंय.