Aishwarya Rai: ऐश्वर्या राय अडचणीत; ‘या’ कारणामुळे सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस
सिन्नरमधील ठणगावजवळ आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्याची सुमारे 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. याच जमिनीचं एक वर्षाचं कर ऐश्वर्याने थकवल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. सिन्नरमधील जमिनीचा 22 हजार रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे. सिन्नरमधील ठणगावजवळ आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्याची सुमारे 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. याच जमिनीचं एक वर्षाचं कर ऐश्वर्याने थकवल्याची माहिती समोर येत आहे. ऐश्वर्यासोबतच इतरही 1200 मालमत्ता धारकांना कर थकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
सिन्नर तहसीलला मालमत्ताधारकांकडून वर्षाकाठी 1.11 कोटींचा महसूल अपेक्षित आहे. त्यापैकी 65 लाखांची वसुली अद्याप बाकी आहे. मार्चअखेरपर्यंत वसुलीचं हे उद्दिष्ट असल्याने महसूल विभागाने हे पाऊल उचललं आहे.
1200 मालमत्ताधारकांना नोटीस
ऐश्वर्या रायसह इतर थकबाकीदारांमध्ये बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रायव्हेड लिमिडेट, मेटकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिडेट, छोटाभाई जेठाभाई पटेल अँड कंपनी, राजस्थान गम प्रायव्हेट लिमिटेड, एल. बी. कुंजीर इंजीनिअर, आयटीसी मराठा लिमिटेड, एस. के. शिवराज, हॉटले लीला व्हेंचर लिमिटेड, कुकरेजा डेव्हलपेंट कॉर्पोरेशन, रामा हँडिक्राफ्ट, ओपी एंटरप्रायझेस कंपनी गुजरात यांचा समावेश आहे.
ऐश्वर्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, गेल्या वर्षी तिचा ‘पोन्नियिन सेल्वन 1’ हा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मणिरत्नम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा प्रदर्शित होणार आहे. यामध्येही ऐश्वर्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 28 एप्रिल 2023 रोजी हा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. पीएस- 2 मध्ये विक्रम, ऐश्वर्या राय, कार्ती आणि जयम रवी यांच्या मुख्य भूमिका आहेत.