“विनाकारण माझी तुलना..”; ऐश्वर्या रायच्या वहिनीची तक्रार, ट्रोलिंगबद्दलही व्यक्त
अभिनेत्री ऐश्वर्या रायची वहिनी श्रीमा राय ही एक ब्युटी आणि फॅशन ब्लॉगर आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र अनेकदा श्रीमाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. त्याबद्दल ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.

अभिनेत्री ऐश्वर्या रायचं माहेर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रीमा राय ही ऐश्वर्याची वहिनी आहे. श्रीमाने ऐश्वर्याचा भाऊ आदित्य रायशी लग्न केलंय. मात्र श्रीमा आणि ऐश्वर्या यांचं फारसं पटत नसल्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी होऊ लागल्या होत्या. श्रीमाच्या सोशल मीडियावर ऐश्वर्यासोबतचे फोटोच दिसत नसल्याची तक्रार नेटकऱ्यांनी केली होती. इतकंच नव्हे तर श्रीमा प्रसिद्धीसाठी ऐश्वर्याच्या नावाचा वापर करत असल्याचंही म्हटलं गेलंय. या सर्व ट्रोलिंगवर अखेर ऐश्वर्याच्या वहिनीने मौन सोडलंय. श्रीमा ही ब्युटी आणि फॅशन ब्लॉगर आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्यावर होणाऱ्या टीकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
मोहसिना अहमदच्या युट्यूबर चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रीमाने ऐश्वर्याचं नाव घेतलं नाही, पण तिच्यामुळे कसा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला, हे अप्रत्यक्षपणे सांगितलं. ती म्हणाली, “हे सर्व एखाद्या भारतीय टीव्ही मालिकेसारखंच आहे. ज्याप्रकारे एखाद्या मालिकेत नवीन पात्र येतं आणि ते नवीन पात्र इथे मी आहे. मला तसंच वाटलं होतं. बॉलिवूडच्या या चर्चांमध्ये मी जणू नवीन पात्र होते. माझ्याबद्दल ते काहीही लिहायचे. काही टीकाकारांनी विनाकारण माझी तुलना करण्यास सुरुवात केली. तुम्ही एखाद्या महिलेच्या प्रवासाची तुलना दुसऱ्या महिलेच्या प्रवासाशी करू शकत नाही. त्या महिलेनं जे केलं ते तिने स्वत:च्या जोरावर केलं नाही, अद्भुत गोष्टी साध्य केल्या नाहीत असं कोणीही म्हणणारा नाही. अर्थात त्यासाठी मनात खूप आदर आहे, पण त्यासाठी तुम्ही दुसऱ्यांचा अनादर करू शकत नाही. फक्त तुम्ही एखाद्या व्यक्तीचे चाहते आहात म्हणून तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला ट्रोल करण्याचा सरसकट अधिकार मिळत नाही.”




View this post on Instagram
ब्लॉगर म्हणून तिच्या करिअरकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याबद्दल खूप वाईट वाटल्याची भावना श्रीमाने या मुलाखतीत व्यक्त केली. फक्त ऐश्वर्या रायच्या कुटुंबाशी संबंधित असल्याने त्याच नावाने ओळखलं जावं, अशीही श्रीमाची इच्छा नाही. याविषयी ती पुढे म्हणाली, “माझी फक्त तीच ओळख असावी, असं मला वाटत नाही. कुटुंबीयांची साथ असणं वेगळी गोष्ट असते. पण जेव्हा तुम्ही स्वत:च्या जिवावर सर्वकाही करता, तेव्हा ते यश तुमचं असतं. ती ओळख तुमच्यापासून हिरावून घेणं अयोग्य आहे.”
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात श्रीमा आणि आदित्यने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. तेव्हा अभिषेक बच्चनची बहीण आणि ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चनने तिला पुष्पगुच्छ पाठवलं होतं. त्याचा फोटो श्रीमाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी श्रीमाला ट्रोल करण्यासा सुरुवात केली होती. ऐश्वर्या रायसोबतचा फोटो कधीच पोस्ट करत नसल्याची तक्रार नेटकऱ्यांनी केली होती.