‘कान फिल्म फेस्टिव्हल’मधील लूकवरून ट्रोल झाल्यानंतर ऐश्वर्याची पहिली प्रतिक्रिया
अभिनेत्री ऐश्वर्या रायचा 'कान फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तिच्या या लूकवरून नेटकऱ्यांनी ट्रोलिंग केली. यावर ऐश्वर्याने प्रतिक्रिया दिली आहे. रेड कार्पेटवरील तिचा लूक हा तिच्या मित्रमैत्रिणींनी डिझाइन केल्याचं ऐश्वर्याने सांगितलंय.
अभिनेत्री ऐश्वर्या रायने यंदाच्या वर्षीही ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला हजेरी लावली. मात्र यावेळी तिने परिधान केलेले कपडे नेटकऱ्यांनी काही रुचले नाहीत. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्याचे दोन्ही लूक काही खास नसल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. ऐश्वर्याच्या सौंदर्याला अनुसरून तिचे कपडे डिझाइन केले नव्हते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या होत्या. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ऐश्वर्याला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं जातंय. त्यावर आता अखेर ऐश्वर्याने प्रतिक्रिया दिली आहे.
ऐश्वर्या ट्रोल का झाली?
‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याचा पहिला लूक हा काळ्या आणि सोनेरी रंगाच्या गाऊनचा होता. हे कपडे ऐश्वर्यासाठी व्यवस्थित डिझाइन केले नव्हते, असं अनेकांनी म्हटलंय. तर काहींनी त्या लूकमध्ये फक्त ऐश्वर्याची हेअरस्टाइल आवडली. ऐश्वर्याचा हा गाऊन जितका मोठा होता, तितकाच तो साधा होता असंही काहींनी म्हटलंय. मात्र ऐश्वर्याने ट्रोलर्सना न जुमानता तिला तो ड्रेस खूप आवडल्याचं म्हटलंय. तो अनुभव अत्यंत ‘जादुई’ होता असं तिने म्हटलंय.
View this post on Instagram
ऐश्वर्याची प्रतिक्रिया
‘वोग’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या तिच्या पहिल्या लूकविषयी म्हणाली, “माझा रेड कार्पेटवरील लूक हा शेन आणि फाल्गुनी पिकॉक या माझ्या खास मित्रांनी डिझाइन केला होता. ड्रेसवरील डिझाइन ही सोन्याला मुलामा लावल्यासारखं दिसत होतं, असं ते म्हणत होते. पण माझ्यासाठी ते फक्त जादुई होतं.” तिच्या या मुलाखतीवरही अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तू तुझ्या मित्रांपेक्षा इतरांना संधी द्यायला पाहिजे होती’, असं एकाने म्हटलं. तर ‘कानमधील ते तुझ्या प्रतिमेला धक्का पोहोचवत आहेत’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ऐश्वर्या ही ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘लॉरिअल’ या कॉस्मेटिक ब्रँडचं प्रतिनिधीत्व करतेय. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे अनेक चित्रपट दाखवले जातात.
ऐश्वर्या दरवर्षी कान फिल्म फेस्टिव्हलला आवर्जून हजेरी लावते. या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याचा रेड कार्पेट लूक लक्षवेधी ठरतो. संपूर्ण जगभरात तिच्या अनोख्या लूक्सची चर्चा होते. यंदाच्या वर्षी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत असतानाही ही पट्टी बांधून रेड कार्पेटवर उपस्थित होती. ऐश्वर्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
ऐश्वर्याने 2002 मध्ये सर्वांत पहिल्यांदा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रेड कार्पेटवर तिने नीता लुल्लाने डिझाइन केलेली साडी आणि त्यावर भरजरी सोन्याचे दागिने परिधान केले होते. त्यावेळी ऐश्वर्याच्या ‘देवदास’ या चित्रपटाचा प्रीमिअर या फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला होता. सहअभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हेसुद्धा ऐश्वर्यासोबत उपस्थित होते. तेव्हापासून ऐश्वर्या दरवर्षी या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावते.