Akshay Kumar: अक्षय कुमारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकवर अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया
'वेडात मराठे..'मधील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक; छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून अजय म्हणाला..
मुंबई: अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या करिअरमधल्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. अक्षयने मंगळवारी चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याच्या या लूकवर सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या या फर्स्ट लूकवर अभिनेता अजय देवगणचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
अजय देवगणने अक्षयचा लूक शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. ‘प्रिय अक्षय कुमार, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटात तुला पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ते माझे आवडते मराठा नायक आहेत आणि या महान योद्धांवर आणखी एक चित्रपट बनवला जात असल्याचा मला आनंद आहे’, असं त्याने लिहिलं.
Dear @akshaykumar, looking forward to seeing you essay the role of Chhatrapati Shivaji Maharaj in the Marathi film – वेडात मराठे वीर दौड़ले सात
He is my favourite Maratha hero and I’m happy yet another film is being made saluting this great warrior. pic.twitter.com/DS1g4pzkxJ
— Ajay Devgn (@ajaydevgn) December 6, 2022
अजय देवगणने त्याच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. तर या चित्रपटात अभिनेता शरद केळकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता. विशेष म्हणजे अक्षयचा लूक समोर आल्यानंतर अनेकांनी पुन्हा एकदा शरदच्या भूमिकेची आठवण काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी शरद केळकर योग्य अभिनेता असल्याचं मत काहींनी नोंदवलं.
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दीक जोशी, सत्या, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट 2023 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.