शाहरुख, सलमानच्या घरी इन्कम टॅक्सने धाड टाकल्यास काय करणार? अजय देवगणचं चक्रावणारं उत्तर
'रेड 2' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान अभिनेता अजय देवगणला सलमान खान आणि शाहरुख खानविषयी मजेशीर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अजयनेही मिश्किल अंदाजात त्याचं उत्तर दिलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजय देवगणच्या ‘रेड 2’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो अमय पटनाईक नावाच्या इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता रितेश देशमुख यामध्ये भष्ट्र राजकीय नेत्याच्या भूमिकेत आहे. मुंबईत या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजयला पत्रकारांनी काही मजेशीर प्रश्नदेखील विचारले. सलमान खान आणि शाहरुख खानच्या घरी इन्कम टॅक्सने धाड टाकली, तर तेव्हा तू काय करणार? असा प्रश्न अजयला विचारण्यात आला. त्यावर अजयनेही त्याच्याच अंदाजात याचं उत्तर दिलं.
“मी चित्रपटात अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे मी स्वत: त्यांच्या घरी धाड टाकायला जाणार नाही. त्यामुळे नेमकं मला काय मॅनेज करायचं आहे हे मला समजलं नाही. जेव्हा कोणाच्या घरी धाड पडली तर मी माझ्या घरी बसलेलो असेन आणि जेव्हा माझ्याच घरी धाड पडेल तेव्हा सर्वजण आपापल्या घरी बसलेले असतील”, असं मिश्किल उत्तर अजयने दिलं. हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.




View this post on Instagram
‘रेड 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राज कुमार गुप्ताने केलं असून येत्या 1 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. राज कुमार गुप्ता यांनी याआधी ‘आमिर’, ‘नो वन किल्ड जेसिका’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि क्रिशन कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2018 मध्ये ‘रेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये 1981 मध्ये घडलेल्या लखनऊमधील एका आयकर अधिकार्याची कथा दाखवण्यात आली होती. जो गरीबांना मदत करण्यासाठी भ्रष्टाचाराचा सामना करतो. . ‘रेड’ या पहिल्या भागात इलियाना डिक्रूझ आणि सौरभ शुक्ला यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट हिट ठरला होता. त्याचाच ‘रेड 2’ हा सीक्वेल आहे. यामध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुखसोबत वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.