मुंबई : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनं कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अवघ्या 25 व्या वर्षी तिने तिचं आयुष्य संपवलं. वाराणसीमधल्या एका हॉटेल रुममध्ये ती मृतावस्थेत आढळली. आकांक्षाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. तर दुसरीकडे आकांक्षाच्या आईने भोजपुरी गायक आणि तिचा बॉयफ्रेंड समर सिंहवर हत्येचा आरोप केला आहे. समरने त्याचा भाऊ संजय सिंहसोबत मिळून आकांक्षाची हत्या केली, असा गंभीर आरोप मधू दुबे यांनी केला आहे. आकांक्षाच्या मृत्यूनंतर समरने सोशल मीडियावर पहिली पोस्ट लिहिली आहे. समरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘नि:शब्द, तुझ्या आत्म्याला शांती मिळो आकांक्षा दुबे’, अशी पोस्ट समर सिंहने लिहिली आहे. आकांक्षाच्या चाहत्यांच्या मते, समर सिंहमुळेच तिने आत्महत्या केली. म्हणूनच त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आकांक्षाच्या मृत्यूला जो जबाबदार असेल, त्याला सोडणार नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘सर्वकाही तुझ्यामुळेच घडलंय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘आकांक्षाच्या जवळची व्यक्ती तूच होतीस, त्यामुळे तुझ्यावरच संशय आहे’, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे.
आकांक्षाने व्हॅलेंटाइन डेनिमित्त इन्स्टाग्रामवर समरसोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे आकांक्षाच्या आईने समर आणि त्याच्या भावावर आरोप केले आहेत.
“समर सिंह आणि संजय सिंह यांनी आकांक्षाकडून तीन वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचं काम करून घेतलं होतं. मात्र त्याचे पैसे त्यांनी रोखून ठेवले होते. 21 तारखेला समर सिंहचा भाऊ संजयने आकांक्षाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबद्दल खुद्द तिनेच मला फोन करून सांगितलं होतं,” अशा दावा मधू दुबे यांनी केला आहे.
आकांक्षा दुबे तीन वर्षांची असतानाच आईवडिलांसोबत मुंबईला राहायला आली. तिने आयपीएस अधिकारी व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. मात्र आकांक्षाला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयात रस होता. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर आकांक्षाचे टिकटॉक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाले होते. भोजपुरी इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल या नावाने ती ओळखली जायची.