मुंबई : भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबे 25 मार्च रोजी वाराणसीमधल्या एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळली होती. आकांक्षाच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला होता. तिच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्यांची उत्तरं अजूनही मिळाली नाहीत. आकांक्षाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. तर दुसरीकडे तिच्या कुटुंबीयांनी एक्स बॉयफ्रेंड समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंहवर आरोप केले होते. याप्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आता आकांक्षाच्या मृत्यूप्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. सारनाथ पोलीस आता तुरुंगात बंद असलेला भोजपुरी गायक समर सिंह, संजय सिंह यांच्यासह इतर चार जणांची डीएनए चाचणी करणार आहे. या चाचणीसाठी पोलिसांनी कोर्टाकडून परवानगीसुद्धा मागितली आहे.
आकांक्षाच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनंतर तिच्या कपड्यांचा रिपोर्ट समोर आला आहे. आकांक्षाच्या अंतर्वस्त्रांमधून सीमेन आढळल्याची माहिती समोर येत आहे. या रिपोर्टनंतर समर सिंह, संजय सिंह आणि इतर चार जणांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. पोलिसांनी तशी परवागनी कोर्टाकडे मागितली आहे. पोलीस उपायुक्त अमित कुमार यांनी सांगितलं की आकांक्षाच्या मृत्यूनंतर तिचे कपडे आणि प्रायव्हेट पार्ट्सचे स्वॅब पॅथोलॉजिकल आणि फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले होते.
“आकांक्षाच्या कपड्यांचा रिपोर्ट समोर आला असून तिच्या अंतर्वस्त्रांमध्ये स्पर्म आढळून आले आहेत. कोर्टाची परवानगी मिळताच आम्ही संजय सिंह, समर सिंह आणि चौघांचे डीएनए सँपल घेऊन पुढील तपास करू”, असं पोलीस म्हणाले.
2019 मध्ये आकांक्षाने भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘मेरी जंग मेरा फैसला’ हा तिचा पहिला चित्रपट होता. आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतल्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि फार कमी वेळात तिला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. लोकप्रियतेसोबतच आकांक्षाने पैसाही कमावला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरुनही पैसे कमवायची. याशिवाय तिचा एक युट्यूब चॅनलसुद्धा आहे.
आकांक्षा दुबे तीन वर्षांची असतानाच आईवडिलांसोबत मुंबईला राहायला आली. तिने आयपीएस अधिकारी व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. मात्र आकांक्षाला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयात रस होता. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर आकांक्षाचे टिकटॉक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाले होते. भोजपुरी इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल या नावाने ती ओळखली जायची.