मुंबई : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं (akanksha dubey) वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये स्वतःला संपवलं आहे. अभिनेत्रीने वयाच्या २५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री आकांक्षाने स्वतःला संपवलं आहे. वयाच्या २५ व्या वर्षी पैसा, प्रसिद्धी असताना अभिनेत्रीने टोकाचा निर्णय घेतल्यामुळे सिनेविश्वात सर्वत्र खळबळ माजली आहे. आकांक्षाने रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. आकांक्षा शुटिंगसाठी वाराणसी याठिकाणी होती. रविवारी सकाळ आकांक्षा नव्या सिनेमाच्या शुटिंगला देखील सुरुवात करणार होती.
नव्या सिनेमाच्या शुटिंगसाठी अभिनेत्रीला सकाळी सात वाजता तयार व्हायचं होतं. शनिवारपर्यंत सर्वांसमोर हसत-खेळत असणाऱ्या आकांक्षाच्या मनात काय सुरु होतं याचा अंदाज कोणालाही आला नाही. तिच्या मनात नक्की काही तरी सुरु असावं असं चाहते म्हणत आहेत. काय करायचं होतं? अभिनेत्री का होती त्रस्त? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत.
महत्त्वाचं म्हणजे स्वतःला संपवण्याच्या काही वेळ आधी अभिनेत्रीने इन्स्टाग्राम लाईव्ह केलं होतं. लाईव्ह आल्यानंतर अभिनेत्री काहीही बोलली नाही तर, ढसाढसा रडत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अभिनेत्रीच्या निधनाची धक्कादायक बातमी सर्वांसमोर आली. आकांक्षाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आकांक्षा दुबे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री होती. फार कमी वयात तिने अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम केलं होतं. अभिनेत्रीच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. शिवाय अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी आकांक्षा दुबे (akanksha dubey) ला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचा तपास सुरु असताना अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड समर सिंह याचा फोन बंद आहे. शिवाय समर सिंह याच्यासोबत कोणताही संपर्क होवू शकत नाही. याप्रकरणानंतर अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पण पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.
मेरी जंग मेरा फैसला सिनेमातून आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘मुझसे शादी करोगी’ (भोजपुरी), वीरों के वीर, फायटर किंग, कसम पैदा करने की 2 यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आकांक्षाच्या आत्महत्येनं भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.