मुंबई : 16 जानेवारी 2024 | मुकेश अंबानी यांच्या श्रीमंतीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. ‘फोर्ब्स’च्या रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्तीत ही तब्बल 887677 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. अब्जाधीश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे देशातील सर्वांत महागड्या गोष्टी आहेत. 15000 कोटी रुपयांच्या ‘अँटिलिया’मध्ये राहणाऱ्या मुकेश अंबानी आणि त्यांच्या मुलांकडे अत्यंत महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहेत. अनेकदा अंबानी कुटुंबीय या गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. सहसा अंबानी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या मागे आणि पुढे सुरक्षेसाठी इतर अनेक गाड्यांचा ताफा पहायला मिळतो. मात्र सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी स्वत: आलिशान कार चालवताना दिसतोय. विशेष म्हणजे आकाश कार चालवत असताना त्याच्या बाजूला अभिनेता रणबीर कपूर बसल्याचं पहायला मिळतंय.
अत्यंत महागड्या लँबोर्गिनी कारमधून आकाश अंबानी आणि रणबीर कपूर प्रवास करताना दिसले. यावेळी पॅसेंजर सीटवर रणबीर बसला होता. ही लँबोर्गिनी उरुस एसयूव्ही कार जवळपास 4 कोटी रुपयांची आहे. आकाश अंबानीच्या आवडत्या गाड्यांपैकी ही एक आहे. मुंबईत त्याला अनेकदा या कारमधून प्रवास करताना पाहिलं गेलंय. आकाशने त्याच्या बाळाला पहिल्यांदा याच कारमधून घरी आणलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. पैसे असतील तर मित्रसुद्धा चांगले भेटतात, असं एकाने लिहिलं. तर ड्राइव्हरसुद्धा अंबानींना ठेवलंय, अशी मस्करी दुसऱ्या युजरने केली.
लँबोर्गिनी उरुस ही अंबानी कुटुंबीयांच्या मोठ्या कार कलेक्शनपैकी अगदी छोटी गोष्ट आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस कलीनन एसयूव्ही, मर्सिडीज- एएमजी G63, लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्रफी, मर्सिडीज मेबेच S580 यांचा समावेश आहे. आकाश अंबानी आणि अनंत अंबानी हे सहसा रोल्स रॉयस कलीनन एसयूव्ही किंवा लँबोर्गिनी उरुसमधून प्रवास करताना दिसतात. तर मुकेश अंबानी हे बॉम्ब प्रूफ मर्सिडीज बेंझ सेडानमध्ये प्रवास करतात.
अंबानी कुटुंबीय आणि आकाश अंबानी यांचं रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट्ट यांच्यासोबत मैत्रीचं नातं आहे. अनेकदा या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना एकत्र पाहिलं गेलं आहे. इतकंच नव्हे तर मुकेश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा एक भाग असलेल्या रिलायन्स ब्रँड्सने आलियाची कंपनी खरेदी केली आहे. आलिया भट्टने लहान मुलांच्या कपड्यांचा ‘एड-ए-मम्मा’ (Ed-a-Mamma) हा ब्रँड लाँच केला होता. ‘द इकोनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अंबानी यांनी आलियाचा हा ब्रँड तब्बल 300 ते 350 कोटी रुपयांच्या डीलमध्ये खरेदी केला आहे.