औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हे तर ‘हा’ सुपरस्टार होता निर्मात्यांची पहिली पसंत
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने जगभरात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

चित्रपटातील प्रत्येक भूमिकेची कास्टिंग योग्य झाली की तिथेच तो 50 टक्के यशस्वी ठरतो, असं म्हटलं जातं. कास्टिंग जितकी चपखल, तितकी त्या भूमिकेला रंगत येते. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाच्या बाबतीतही हेच घडताना दिसलं. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल जितका योग्य वाटतो, तितकाच योग्य औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना वाटतो. औरंगजेब साकारणारा अभिनेता हा अक्षय खन्नाच आहे, हे कदाचित सांगितलं नसतं तर कोणाला समजलंही नसतं, इतका त्याचा लूक जबरदस्त आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक-समिक्षक त्याच्या दमदार अभिनयकौशल्याचं कौतुक करत आहेत. मात्र औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाच निर्मात्यांची पहिली निवड नव्हती. त्यांनी दुसऱ्या एका अभिनेत्याचा त्या भूमिकेसाठी विचार केला होता.
‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार ‘छावा’मधील औरंगजेबाच्या भूमिकेसाठी सर्वांत आधी अभिनेते अनिल कपूर यांना विचारण्यात आलं होतं. अनिल कपूरसुद्धा या भूमिकेसाठी तयार होते. ते चित्रपट साइन करणार होते. जर सर्वकाही ठीक असतं तर ‘छावा’मध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाच्या जागी प्रेक्षकांना अनिल कपूरच दिसले असते. मात्र काही कारणांमुळे नंतर ही भूमिका अक्षयच्या पदरात पडली आणि त्याच्या कामगिरीचं आता प्रचंड कौतुक होत आहे. अक्षय खूप मोजके चित्रपट करतो, पण त्याच्या प्रत्येक भूमिकेला तो मोठ्या पडद्यावर पूर्ण न्याय देतो. हेच औरंगजेबाच्या भूमिकेबद्दलही पहायला मिळालं. अक्षयने पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटातील भूमिका साकारली आहे. त्याचं अभिनय पाहिल्यानंतर औरंगजेबाच्या भूमिकेसाठी दुसरा कोणताच अभिनेता इतका परफेक्ट वाटला नसता, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.




View this post on Instagram
‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 2025 या वर्षात 200 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला 116 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटात दिव्या दत्ता, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.