लागोपाठ 16 फ्लॉप चित्रपटांबद्दल अखेर अक्षय कुमारने सोडलं मौन; म्हणाला..
अभिनेता अक्षय कुमार लवकरच 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान अक्षय त्याच्या फ्लॉप चित्रपटांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र त्याच्या करिअरमध्ये असाही काळ होता, जेव्हा त्याचे चित्रपट लागोपाठ फ्लॉप झाले. आता तो ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय त्याच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल व्यक्त झाला. ‘सेल्फी’, ‘मिशन रानीगंज’ यांसारखे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले होते. याविषयी अक्षय म्हणाला की चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी तो बरीच मेहनत घेतो, मात्र बॉक्स ऑफिसवर त्याचं काय नशीब असेल हे त्याच्या हातात नाही.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अक्षय म्हणाला, “आम्ही प्रत्येक प्रकारच्या चित्रपटासाठी प्रयत्न करत असतो. मी एकाच चौकटीत अडकून बसत नाही. एका जॉनरवरून दुसऱ्या जॉनरवर मी सतत उड्या मारतच असतो. मग त्यात यश मिळो किंवा न मिळो. मी नेहमीच अशाच पद्धतीने काम केलंय. यापुढेही तसंच करत राहीन. काही सामाजिक, काही चांगल्या कथेचे, काही कॉमेडी आणि काही ॲक्शन..”
View this post on Instagram
“मी नेहमी विविध प्रकारचे चित्रपट करत राहीन. लोक म्हणतात म्हणून मी एकाच प्रकारच्या कामात अडकून पडणार नाही. सर आजकाल कॉमेडी आणि ॲक्शन खूप चालतंय, असं लोक म्हणतात. पण याचा अर्थ असा नाही की मी फक्त ॲक्शनच करेन. एकाच प्रकारचे चित्रपट करून मी स्वत: कंटाळून जाईन. टॉयलेट: एक प्रेम कथा असो, एअरलिफ्ट असो किंवा रुस्तम.. जेवढे चित्रपट मी केले आहेत, त्यापैकी काहींना यश मिळालं तर काहींना नाही”, असं तो पुढे म्हणाला.
निवडीविषयी बोलताना अक्षय त्याच्या फ्लॉप चित्रपटांविषयीही व्यक्त झाला. एकेकाळी त्याचे लागोपाठ 16 चित्रपट फ्लॉप ठरले होते. “मी असा काळ याआधी पाहिला नाही, अशातला भाग नाही. माझ्या करिअरमध्ये एक काळ असा होता, जेव्हा माझे 16 चित्रपट लागोपाठ फ्लॉप झाले होते. पण मी तिथेच उभा राहून माझं काम करत राहिलो. यापुढेही मी काम करत राहीन. यावर्षातला हा एक असा चित्रपट आहे, ज्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. आता त्याचे परिणाम बघण्यासाठी मी सज्ज आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला यश मिळेल, अशी अपेक्षा आहे”, अशा शब्दांत अक्षय व्यक्त झाला.