Alia Bhatt | अवघ्या 4 महिन्यांत आलिया भट्टचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी करणं हे प्रत्येक आईसाठी खूप आव्हानात्मक असतं. त्यातही जर तुम्ही सेलिब्रिटी असाल, तर दिसण्यावरून नेटकऱ्यांकडून कमेंट्स केल्या जातात.
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर आलिया काही महिने कॅमेरापासून लांब होती. मात्र आता पुन्हा एकदा ती ग्लॅमरविश्वात सक्रिय झाली आहे. आलियाची मुलगी राहा आता चार महिन्यांची होणार आहे. बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी करणं हे प्रत्येक आईसाठी खूप आव्हानात्मक असतं. त्यातही जर तुम्ही सेलिब्रिटी असाल, तर दिसण्यावरून नेटकऱ्यांकडून कमेंट्स केल्या जातात. अनेकदा बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागतो. मात्र आलियाने अवघ्या चार महिन्यांत तिचं वजन कमी केलं आहे. तिचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आलियाचा हा व्हिडीओ पापाराझींनी शूट केलेला आहे. वर्कआऊटच्या कपड्यांमध्ये ती गाडीतून बाहेर पडते आणि फोटोसाठी काही सेकंद पोझ देते. मात्र यावेळी तिची फिटनेस आणि चेहऱ्यावरील तेज पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. आलियाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
‘संतूर मॉम’ असं एकाने लिहिलंय. तर काही महिन्यांपूर्वीच तिने बाळाला जन्म दिला, असं म्हणताच येणार नाही, असं दुसऱ्या युजरने लिहिलं. चार महिन्यांत आलियाने स्वत:चं रुपांतर शनायामध्ये केलंय, असंही एकाने म्हटलंय. बाळंतपणानंतर तिच्या चेहऱ्यावरील तेज वाढलंय, असं कौतुक नेटकऱ्यांनी केलंय.
View this post on Instagram
आलियाला नुकतंच दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि आलियामधील खास बाँडींग पहायला मिळाली. तर आलियाचा पती आणि अभिनेता रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र: पार्ट 1’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
आलिया लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती रणवीर सिंगसोबत भूमिका साकारणार आहे. याशिवाय तिचा पहिलावहिला हॉलिवूड चित्रपटसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ असं तिच्या या चित्रपटाचं नाव असून यामध्ये तिने गल गडॉटसोबत काम केलं आहे.