Alia Bhatt | वडील महेश भट्ट यांच्या व्यसनाविषयी पहिल्यांदाच आलिया व्यक्त; म्हणाली “त्यांच्याकडे पैसेही नव्हते..”
अभिनेत्री आलिया भट्टने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आई सोनी राजदान आणि वडील महेश भट्ट यांच्या संघर्षाबद्दल वक्तव्य केलं. "मी स्वत: स्टारकिड असले तरी माझ्या आईवडिलांनी खूप संघर्ष केला", असं ती म्हणाली. त्याचप्रमाणे वडिलांच्या दारूच्या व्यसनाबद्दल ती पहिल्यांदाच व्यक्त झाली.
मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची मुलगी आलिया भट्टने बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण केलं. आलियावर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. त्यावर तीसुद्धा विविध मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली. स्टार किड असल्यामुळे संधी जरी लवकर मिळाली तरी अभिनय चांगला जमत नसेल तर प्रेक्षकसुद्धा तुम्हाला स्वीकारत नाहीत, असं तिचं मत आहे, आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आलियाने तिच्या आई-वडिलांच्या संघर्षाबद्दल सांगितलं. बॉक्स ऑफिसवर बरेच चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर वडील महेश भट्ट व्यसनाधीन झाले होते, असा खुलासा तिने केला.
“करिअरच्या एका टप्प्यावर त्यांनाही बऱ्याच फ्लॉप चित्रपटांना सामोर जावं लागलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. अशा परिस्थितीत ते व्यसनाधीन झाले होते. काही काळानंतर त्यांनी दारूचं व्यसन सोडलं. मात्र त्यांच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये बरेच चढउतार आले. आज मला स्टारकिड असल्याचा जो विशेषाधिकार मिळाला आहे, त्यासाठी माझ्या आईवडिलांनी खूप संघर्ष केला आहे. मला त्याची जाणीव आहे. भविष्यात जर मला संधी मिळाल्या नाहीत किंवा काम मिळणं बंद झालं, तरी मी त्याबद्दल तक्रार करणार नाही. कारण आतापर्यंत मला खूप चांगल्या संधी मिळाल्या आहेत आणि त्यासाठी मी कृतज्ञ आहे”, असं ती म्हणाली.
View this post on Instagram
आई सोनी राजदानविषयी आलिया पुढे म्हणाली, “माझ्या आईचीही कोणतीच पार्श्वभूमी नव्हती आणि आपण पुढे कसं जाणार याचीही तिला काहीच माहिती नव्हती. फिल्म इंडस्ट्रीत तिचे काहीच कनेक्शन नव्हते. थिएटरपासून फिल्म स्टुडिओ आणि स्टुडिओपासून टेलिव्हिजन स्टुडिओपर्यंत तिने ऑडिशन्स दिले. त्यावेळी तिला नीट हिंदीही बोलता येत नव्हती. त्यामुळे तिचाही संघर्ष मला माहीत आहे. ती कधीच मेनस्ट्रीम हिरोईन बनू शकली नाही. पण तिने खूप मेहनत घेतली. कोणतंच काम आईने कमी मानलं नाही. मिळेल ते काम ती करत गेली.”
आलियाने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकताच तिला ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.