Alia Bhatt | बॉयकॉट बॉलिवूडवर अखेर आलिया भट्टने सोडलं मौन; ‘पठाण’वरून ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
'पठाण'मुळे बॉलिवूडला नवसंजीवनी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. कारण गेल्या महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करत नाहीयेत. त्यातच बॉयकॉट बॉलिवूडचा फटका बऱ्याच चित्रपटांना बसला.
मुंबई: सध्या बॉलिवूडमध्ये फक्त ‘पठाण’चीच जोरदार चर्चा आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर देशभरात पहिल्या दोन दिवसांतच 120 ते 125 कोटी रुपयांची कमाई झाली. ‘पठाण’मुळे बॉलिवूडला नवसंजीवनी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. कारण गेल्या महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करत नाहीयेत. त्यातच बॉयकॉट बॉलिवूडचा फटका बऱ्याच चित्रपटांना बसला. आता अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडविषयी व्यक्त झाली आहे. ‘पठाण’विषयी पोस्ट लिहिताना आलियाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
शुक्रवारी आलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ‘पठाण’चा पोस्टर शेअर केला. त्यावर तिने लिहिलं, ‘कारण प्रेम नेहमीच जिंकतं.’ पठाणच्या कमाईविषयी तिने पुढे लिहिलं, ‘काय धमाका आहे हा!’ 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या पठाणने केवळ भारतातच नाही तर जगभरात तुफान कमाई केली आहे.
आलियाने ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटात शाहरुखसोबत काम केलं होतं. आलियाशिवाय निर्माता दिग्दर्शक करण जोहर, पूजा भट्ट आणि इतर सेलिब्रिटींनीही ‘पठाण’साठी सोशल मीडियावर पोस्ट लिहित कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून स्क्रीन्सचीही संख्या वाढवण्यात येत आहे. सध्या जगभरातील 8500 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित जाला आहे. पठाणच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खान मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर परतला आहे. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत.
पठाणच्या निमित्ताने दीपिका आणि शाहरुख चौथ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी दोघांनी ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅपी न्यू इअर’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.