Alia Bhatt: आलिया भट्टने 3 महिन्यांपर्यंत सर्वांपासून का लपवली प्रेग्नेंसी? अखेर सांगितलं कारण

गरोदरपणातील काळ कसा होता? आलियाने सांगितला अनुभव; प्रेग्नेंसी लपवण्यामागचं कारणंही केलं स्पष्ट

Alia Bhatt: आलिया भट्टने 3 महिन्यांपर्यंत सर्वांपासून का लपवली प्रेग्नेंसी? अखेर सांगितलं कारण
Alia Bhatt
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2023 | 2:37 PM

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्टने एप्रिल 2022 मध्ये रणबीर कपूरशी लग्न केलं आणि नोव्हेंबरमध्ये मुलगी राहाला जन्म दिला. आलियाचं लग्न आणि तिची प्रेग्नेंसी हा सर्वाधिक चर्चेचा विषय होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या प्रेग्नेंसीच्या काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पहिल्या 12 आठवड्यांपर्यंत प्रेग्नेंसीबद्दल कोणालाच का सांगितलं नव्हतं, याचं कारणही आलियाने सांगितलं. त्याचसोबत तिला या काळात कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, याविषयीही ती व्यक्त झाली.

जून 2022 मध्ये सोनोग्राफीचा फोटो पोस्ट करत आलियाने चाहत्यांना गोड बातमी सांगितली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आलियाने सांगितलं की तिने 12 आठवड्यांपर्यंत प्रेग्नेंसीबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं, कारण तिला तसं सांगण्यात आलं होतं. याशिवाय वर्क कमिटमेंट्स आणि प्रोजेक्ट्समुळेही त्याविषयी कोणाला सांगता आलं नाही, असं ती म्हणाली.

“जोपर्यंत तुमचं शरीर हतबल होत नाहीत, तोपर्यंत स्वत:ला चौकटीत किंवा एखाद्या परिस्थितीत बांधून ठेवणं मला आवडत नाही. गरोदर असल्यामुळे माझ्यावर काही बंधनं होती, कारण त्या परिस्थितीत आपण कोणतेही अंदाज वर्तवू शकत नाही. मात्र जे जसं होईल त्याचा सामना करण्याची मनाची तयारी मी ठेवली होती. माझं बाळ आणि माझं आरोग्य यांना प्राधान्य दिलं. माझी तब्येत ठीक असेल तोपर्यंतच मी अधिक काम करेन, असं ठरवलं होतं”, असं आलियाने सांगितलं.

गरोदरपणातील काळाबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, “सुदैवाने गरोदरपणामुळे माझ्या कामात कोणताच अडथळा आला नाही. मात्र हो, सुरुवातीच्या काही आठवड्यांत मला थकवा आणि उल्ट्यांचा त्रास जाणवला. मात्र तेव्हा मी याबद्दल कोणालाच काही बोलू शकत नव्हती. कारण पहिल्या 12 आठवड्यांपर्यंत तुम्हाला कोणालाच काही सांगायचं नसतं. असं अनेकजण म्हणतात, म्हणून मी प्रेग्नेंसीबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं.”

शूटिंग करताना थकवा जाणवला तर आलिया तिच्या व्हॅनिटी वॅनमध्ये जाऊन आराम करायची. ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा हॉलिवूडचा पहिला प्रोजेक्ट आलियाने जानेवारी 2022 मध्ये साईन केला होता. या चित्रपटाचं शूटिंग तिने गरोदरपणात पूर्ण केलं. विशेष म्हणजे हा ॲक्शनपट होता. यासोबतच आलिया तिच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचं प्रमोशनदेखील करत होती.

आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंगने मुख्य भूमिका साकारली आहे.