संध्या थिएटच्या चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन अन् चित्रपट निर्मात्यांकडून 2 कोटींची मदत
संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' च्या प्रीमियरवेळी झालेल्या दुर्घटनेत मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन आणि चित्रपट निर्मात्यांनी 2 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घोषणेनंतर या प्रकरणाचे पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
संध्या थिएटच्या चेंगराचेंगरीतील दुर्घटनेमुळे अभिनेता अल्लू अर्जुन सध्या प्रचंड अडचणीत आहे. त्याच्यावरील आरोप आणि संकटे वाढतच चालले पाहायला मिळत आहे. तसेच या दुर्घटनेतील महिलेच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत करावी या मागणीसाठी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्लाही करण्यात आला होता. मात्र आता यावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे.
मृत महिलेच्या कुटुंबासाठी मोठी घोषणा
साउथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय. गुरुवारी निर्माते दिल राजू यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सरकार आणि चित्रपट उद्योग यांच्यातील संबंधांना चालना मिळावी यासंदर्भात होती.
दरम्यान, अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील आणि दिल राजू यांनी देखील रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाच्या तब्येतीचीही चौकशी केली. अल्लू अरविंद डॉक्टरांशी बोलले, त्यांनी सांगितले की मुलगा बरा होत आहे आणि तो स्वत: श्वास घेऊ शकत आहे.
निर्मात्यांकडून पीडित कुटुंबाला 2 कोटींची मदत
चेंगराचेंगरी प्रकरणात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुनकडून 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर पुष्पा प्रोडक्शन कंपनी मैत्री मूव्ही मेकर्सने 50 लाख रुपये तर,या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी 50 लाख रुपये असे 2 कोटी रुपयांची मदत मुलाच्या कुटुंबाला देण्यात आले आहे.
या मृत महिलेच्या कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याच्या बॉडीगार्ड तसेच थिएटर मालकावर चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 डिसेंबर रोजी काय घडली होती घटना
‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमियर शो 4 डिसेंबर रोजी पार पडला. हा शो हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये पार पडला. यावेळी अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यावेळी थिएटरमधील चेंगराचेंगरीत तिचा 8 वर्षांचा मुलगा देखील जखमी झाला. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती.
अल्लू अर्जुनची चौकशीही झाली
संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनची मंगळवारी 4 तास चौकशी केली. या चौकशी दरम्यान अभिनेता अल्लू अर्जुनला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याचबरोबर अभिनेत्याला 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा व्हिडीओ देखील दाखवण्यात आला. त्यावेळी तो व्हिडीओ पाहून अभिनेता अल्लू अर्जुन भावूक झाला.
प्रकरणावर पडदा पडणार का?
दरम्यान यासाठी अल्लू अर्जुनला पोलिसांनी चौकशीसाठीही बोलावले होते. रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनची जवळपास 3 ते 4 चार तास चौकशी सुरु असल्याचे म्हटले जाते. मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन अन् चित्रपट निर्मात्यांकडून 2 कोटींची मदत जाहिर केल्यानंतर तरी या प्रकरणावर पडदा पडेल का हे पाहणं महत्वाचं आहे.
अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 बद्दल बोलायचं तर या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. आजही थिएटरमध्ये हा चित्रपट तुफान चालतोय. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय.