अटकेआधी अल्लू अर्जुनने पत्नीला केलं किस; पोलिसांकडे नाश्त्यासाठी मागितला वेळ, पहा व्हिडीओ
‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती.
हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती आणि त्यात 35 वर्षी एम. रेवती या महिलेचा मृत्यू झाला होता. रेवती यांच्या नऊ महिन्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी अल्लू अर्जुनला अटक करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी पोलीस पोहोचले होते. यावेळचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन त्याच्या घराबाहेर उभा असून त्याच्यासोबत पत्नी स्नेहा रेड्डी, वडील अल्लू अरविंद, भाऊ अल्लू सिरीश हे सर्वजण तिथे उपस्थित असल्याचं दिसतंय. पोलिसांच्या गाडीत बसण्याआधी अल्लू अर्जुन उभा राहून कॉफी पितोय. त्याचसोबत तो त्याच्या पत्नीला काही गोष्टी समजावून सांगतोय. घाबरलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी तो तिच्या कानात काहीतरी सांगतो. त्यानंतर अल्लू अर्जुन पोलिसांसोबतही बोलतो. पोलिसांच्या गाडीत बसण्याआधी अल्लू अर्जुन त्याच्या पत्नीच्या गालावर किस करतो आणि हसत गाडीमध्ये बसायला जातो.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनने अटकेला विरोध केला नाही, मात्र त्याच्या बेडरूमपर्यंत पोलिसांनी येणं योग्य नव्हतं, असं तो म्हणाला. त्याचप्रमाणे पोलिसांनी त्याला कपडे बदलण्यासाठी किंवा नाश्ता पूर्ण करण्यासाठीही वेळ दिला नसल्याचं तो म्हणाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संपूर्ण व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव किंवा चिंता दिसत नव्हती. अटकेच्या वेळी अल्लू अर्जुनने घातलेला हुडीसुद्धा चर्चेत आला आहे. ‘फ्लावर नही, फायर है’ हा पुष्पामधील त्याचा डायलॉग हुडीवर दिसत आहे.
సంధ్య థియేటర్ ఘటన కేసులో అల్లు అర్జున్ అరెస్ట్ ..#alluarjun #pushpa2 #alluarjunarrest #tv9telugu #breakingnews pic.twitter.com/xbph6jYHGS
— TV9 Telugu (@TV9Telugu) December 13, 2024
नेमकं काय घडलं होतं?
4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आयोजित ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरसाठी 35 वर्षीय एम. रेवती या त्यांचे पती एम. भास्कर, नऊ वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांच्या मुलीसोबत आल्या होत्या. रात्री 9.30 च्या सुमारास जेव्हा अल्लू अर्जुन त्याच्या सुरक्षेसह थिएटरमध्ये आला, तेव्हा त्याच्यासोबत असंख्य चाहत्यांनी थिएटरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थिएटर व्यवस्थापनाकडून कोणतीच अतिरिक्त तरतूद करण्यात आली नव्हती. यावेळी अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकासह मोठ्या संख्येने लोक खालच्या बाल्कनी परिसरात घुसले. या गर्दीत रेवती आणि तिचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेज यांचा श्वास गुदमरला. तिथे ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना खालच्या बाल्कनीतून बाहेर काढलं. त्यांनी रेवती यांच्या मुलावर सीपीआर करून त्यांना तातडीने जवळच्या दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं आणि त्यांच्या मुलाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.