‘एवढा उत्साह सरकारी अधिकाऱ्यांनी..’; अल्लू अर्जुनच्या अटकेवरून संतापला अभिनेता
हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या होत्या.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला त्याच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी शहर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला कडेकोड बंदोबस्तात त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं आणि पोलीस वाहनातून चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. 4 डिसेंबरच्या रात्री घडलेल्या घटनेत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या नऊ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. तेव्हाच ही घटना घडली. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत. घडलेली घटना ही दुर्दैवी असली तरी त्यासाठी एकाच व्यक्तीला जबाबदार ठरवणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी दाक्षिणात्य अभिनेता नानीने थेट सरकार आणि माध्यमांवरही निशाणा साधला.
‘पुष्पा 1’ आणि ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने म्हटलंय, ‘मी सध्या जे पाहतेय त्यावर माझा विश्वास बसत नाहीये. घडलेली घटना ही दुर्दैवी आणि अत्यंत दु:खद होती. मात्र सर्व काही एकाच व्यक्तीवर दोषारोप होत असल्याचं पाहून मी निराश आहे. ही परिस्थिती अविश्वसनीय आणि हृदयद्रावक आहे.’ बॉलिवूड अभिनेता वरुण धवनला त्याच्या ‘बेबी जॉन’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर तो म्हणाला, “सुरक्षेच्या प्रोटोकॉलविषयी अभिनेता स्वत: काही करू शकत नाही. तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांना सांगू शकतो. घडलेली घटना अत्यंत वेदनादायी होती. मी सहवेदना व्यक्त करतो. पण त्यासाठी आपण एका व्यक्तीला दोष देऊ शकत नाही.”
अभिनेता नानीनेही त्याच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित सरकार आणि माध्यमांवर निशाणा साधला. ‘चित्रपटसृष्टीतील लोकांशी संबंधित कोणत्याही गोष्टीत सरकारी अधिकारी किंवा मीडिया जो उत्साह दाखवतात, तसाच उत्साह सामान्य नागरिकांसाठीही दाखवला जावा अशी माझी इच्छा आहे. असं झाल्यास आपण एका चांगल्या समाजात राहिलो असतो’, असं त्याने म्हटलंय. रश्मिका, वरुण आणि नानीशिवाय संदीप किशन, नंदमुरी बालकृष्ण यांसारख्या सेलिब्रिटींनीही अल्लू अर्जुनला पाठिंबा दिला.
I wish the kind of enthusiasm government authorities and media show in anything related to people from cinema was also there for the regular citizens. We would have lived in a better society. That was an unfortunate incident and it was heart breaking. We should all learn from the…
— Nani (@NameisNani) December 13, 2024
संध्या थिएटरमधील दुर्घटनेप्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे शहर पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सेक्युरिटी टीम यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.