“आमच्यासाठी ही वेळ..”; अल्लू अर्जुनच्या घराच्या मोडतोडप्रकरणी अखेर वडिलांनी सोडलं मौन
'पुष्पा 2' या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन वादात अडकला आहे. रविवारी काही आंदोलकांनी त्याच्या घराची मोडतोड केली.
‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे वादात अडकलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबाद इथल्या घराची मोडतोड करण्यात आली. आंदोलकांनी अभिनेत्याविरोधात घोषणाबाजी केली तसंच महिलेल्या न्याय देण्याची मागणी केली. 4 डिसेंबर रोजी ‘संध्या’ थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा नऊ वर्षांचा मुलगा बेशुद्ध झाला होता. त्यावेळी चित्रपट पाहण्यास गेलेल्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. रविवारी घराच्या मोडतोडीच्या घटनेनंतर अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी माध्यमांशी बोलताना अल्लू अरविंद म्हणाले, “आमच्या घरात आज काय केलं ते प्रत्येकाने पाहिलंय. पण या घडीला आम्हाला विचारपूर्वक वागावं लागणार आहे. आमच्यासाठी आता कोणतीही प्रतिक्रिया देण्याची ही योग्य वेळ नाही. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. आमच्या घराजवळ येऊन जो कोणी गोंधळ निर्माण करेल. त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. अशा घटनांना कोणीच प्रोत्साहन देऊ नये. इथे मीडिया आहे म्हणून मी ही प्रतिक्रिया देत नाहीये. आता संयमाने वागण्याची ही वेळ आहे. कायद्यानुसार सर्व गोष्टी होतील.”
View this post on Instagram
रविवारी अल्लू अर्जुनच्या घराची मोडतोड करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यांनी ‘उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कारवाई समिती’चे (OU JAC) सदस्य असल्याचा दावा केला आहे. दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात आंदोलक अल्लू अर्जुनच्या घरावर दगड, टोमॅटो फेकताना आणि झाडांच्या कुंड्या फेकताना दिसून येत आहेत.
चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या रेवती या महिलेसाठी आंदोलक न्यायाची मागणी करत होते. दरम्यान, तेलंगणाचे पोलीस महासंचालक जितेंद्र यांनी चित्रपट कलाकारांनी आणि अन्य सर्वांनी नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचं समजून घ्यावं आणि त्यानुसारच वागणूक ठेवावी, असा सल्ला दिला. 4 डिसेंबर रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली. संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अल्लू अर्जुन पोहोचल्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आणि त्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.