‘पुष्पा 2’च्या सेटवरून अल्लू अर्जुनचा फोटो लीक; लूक पाहून चक्रावले चाहते
‘पुष्पा : द राईज’ या ब्लॉकबस्टर पॅन इंडिया चित्रपटानंतर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन ग्लोबल सुपरस्टार बनला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. इतकंच नव्हे तर यातील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसुद्धा मिळाला होता.
मुंबई : 31 डिसेंबर 2024 | साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ (पुष्पा 2) या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सध्या या चित्रपटासाठी जोरदार शूटिंग सुरू आहे. याआधी सीक्वेलमधील अल्लू अर्जुनचा हटके लूक प्रदर्शित करत निर्मात्यांनी चाहत्यांना सरप्राइज दिला होता. त्यानंतर आता चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर लीक होत आहे. या फोटोमध्ये पुन्हा एकदा अनोख्या अंदाजात पहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
‘पुष्पा 2’च्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन ‘गंगम्मा तल्ली’च्या अवतारात दिसला होता. आता तशाच रुपात म्हणजेच साडी नेसलेला अल्लू अर्जुन या दुसऱ्या फोटोमध्ये पहायला मिळतोय. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा: द रुल’ हा चित्रपट यावर्षी ऑगस्ट महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनचा साडीतील फोटो पाहून नेटकऱ्यांनी कथेविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे.
पहा फोटो
‘पुष्पा 2’च्या फर्स्ट लूक पोस्टमध्येही अल्लू अर्जुन एका महिलेच्या अवतारात दिसला होता. चित्रपटात पुष्पा ‘गंगम्मा तल्ली जत्रा’मध्ये भाग घेणार आहे आणि त्यामुळेच त्याने तसा लूक केला आहे. गंगम्मा तल्ली जत्रा ही तिरुपतीमधील प्रचलित प्रथा आहे. दरवर्षी ही जत्रा आठवडाभर साजरी केली जाते. अखेरच्या दिवशी पुरुष महिलांच्या पोशाखात तयार होतात आणि गंगम्माचं रुप धारण करतात. गंगम्मा तल्ली म्हणजेच गंगम्मा आई ही वाईट प्रवृत्तींचा नाश करणारी मानली जाते.
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा : द राईज’ हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. यामध्ये अल्लू अर्जुनसोबतच रश्मिक मंदाना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत होते. अल्लू अर्जुनला ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’देखील मिळाला आहे. यानिमित्ताने अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी काहीच फी घेतली नाही. मात्र तरीसुद्धा अल्लू अर्जुन कोट्यवधी रुपयांत कमाई करणार आहे. कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या एकूण कमाईपैकी 33 टक्के भाग त्याला मिळणार आहे.