“महिलेच्या मृत्यूबद्दल सांगूनही अल्लू अर्जुनने..”; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर
'पुष्पा 2' या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे अभिनेता अल्लू अर्जुन वादात अडकला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत.
हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे. एकीकडे राजकीय नेत्यांकडून अल्लू अर्जुनवर टीका केली जातेय, तर दुसरीकडे अल्लू अर्जुनच्या हैदराबाद इथल्या घराची मोडतोड करण्यात येत आहे. अशातच तेलंगणा पोलिसांनी रविवारी चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली. थिएटरबाहेर झालेल्या गोंधळात आणि चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्यानंतरही अल्लू अर्जुनने तिथून जाण्यास नकार दिला होता, असं पोलीस म्हणाले. 4 डिसेंबर रोजी ही घटना घडली. संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अल्लू अर्जुन पोहोचल्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आणि त्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांकडून फुटेज जारी
राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली होती. त्याने म्हटलं होतं की चेंगराचेंगरीविषयी कळताच तो संध्या थिएटरमधून लगेच बाहेर पडला होता. मात्र आता पोलिसांनी याविरोधातील माहिती सांगितली आहे. रविवारी पोलिसांनी थिएटरमध्ये फुटेज जारी केले. यामध्ये अल्लू अर्जुन मध्यरात्रीपर्यंत थिएटरमध्ये असल्याचं पहायला मिळत आहे. त्याने पोलिसांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तेलंगणा पोलिसांनी केला आहे.
“विनंतीनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्येच”
या पत्रकार परिषदेत हैदराबाद शहर पोलीस आयुक्त सी. व्ही आनंद यांनी चेंगराचेंगरी आणि त्यानंतरच्या घटनांच्या क्रमाचे व्हिडीओ सर्वांसमोर दाखवले. चिक्कडपल्ली झोनचे एसीपी रमेश कुमार म्हणाले की थिएटर मॅनेजरने सुरुवातीला पोलिसांनी अल्लू अर्जुनजवळ जाण्याची परवानगी दिली नाही. पोलिसांचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवला जाईल, असं त्यांना मॅनेजरकडून सांगण्यात आलं. तरीसुद्धा अल्लू अर्जुन तिथून निघाला नाही. अखेर पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला महिलेच्या मृत्यूविषयी आणि तिच्या नऊ वर्षांच्या मुलाच्या स्थितीविषयी सांगितलं. तरीसुद्धा त्यानेही याकडे कानाडोळा केला, असा दावा एसीपींनी केला आहे.
“अखेर आम्ही जेव्हा अल्लू अर्जुनजवळ पोहोचलो तेव्हा त्याला महिलेच्या मृत्यूविषयी आणि तिच्या मुलाविषयी सांगितलं. थिएटरबाहेर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचीही कल्पना दिली. मात्र तरीही त्याने तिथून जाण्यास नकार दिला. चित्रपट पाहिल्यानंतर मी इथून जाईन, असं तो म्हणाला”, अशी धक्कादायक माहिती एसीपींनी दिली.
पोलिसांकडून बाऊन्सर्सना सक्त ताकीद
“पोलिसांनी वारंवार विनंती करूनही अल्लू अर्जुन तिथून गेला नाही. तो तिथून निघाला असता तर परिस्थिती नियंत्रणात आणता आलं असतं. या व्हिडीओ फुटेजमधून तुम्हाला स्पष्ट दिसत नाहीये का की नेमकं काय झालंय? पोलीस अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अभिनेत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांचा सामना करावा लागला”, असं आयुक्त म्हणाले. पोलिसांनी दाखवलेले हे फुटेज सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून मिळवून एकत्र केलेले आहेत. अल्लू अर्जुनच्या वैयक्तिक सुरक्षारक्षकांनी लोकांना आणि पोलिसांनाही बाजूला ढकलल्याची माहिती समोर येत आहे.
“सेलिब्रिटींनी नियुक्त केलेल्या बाऊन्सर्सना मी याठिकाणी इशारा देतोय की त्यांना त्यांच्या वागणुकीसाठी जबाबदार धरलं जाईल. मी बाऊन्सर आणि त्यांच्या एजन्सींना कडक ताकीद देतोय की त्यांच्यापैकी कोणीही गणवेशातील पोलीस कर्मचाऱ्याला किंवा सामान्य नागरिकांना स्पर्श केला किंवा धक्का दिला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. संध्या थिएटरमध्ये बाऊन्सर कसे वागले, लोकांना कशी धक्काबुक्की केली, पोलिसांनाही कसं ढकललं हे आपण पाहिलंय. सेलिब्रिटीही त्यांनी भाड्याने घेतलेल्या बाऊन्सर्सच्या वागणुकीला जबाबदार आहेत”, असं आयुक्तांनी म्हटलंय.