अल्लू अर्जुनच्या मुलाने गायलं ‘लुट पुट गया’ गाणं; शाहरुखने कमेंट करत लिहिलं..
अल्लू अर्जुनच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटातील 'लुट पुट गया' गाणं गाताना दिसतोय. या व्हिडीओवर आता शाहरुखने कमेंट केली आहे. शाहरुखच्या कमेंटवर अल्लू अर्जुननेही प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : 26 जानेवारी 2024 | साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनच्या मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनचा मुलगा अयान एका कारमध्ये बसून शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटातील ‘लुट पुट गया’ गाणं गाताना दिसतोय. त्याच्या मांडीवर त्याची छोटी बहीण बसलेली पहायला मिळतेय. अयानने गायलेल्या गाण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. शाहरुखच्या फॅन क्लबनेही हा व्हिडीओ शेअर केला असून त्यावर आता खुद्द ‘किंग खान’ने प्रतिक्रिया दिली आहे.
अयानचा हा व्हिडीओ खूपच क्यूट असल्याचं शाहरुखच्या चाहत्यांनी म्हटलंय. मधे मधे तो शाहरुखची नक्कल करण्याचाही प्रयत्न करतोय. अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. शाहरुखच्या एका फॅन अकाऊंटनेही एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर कमेंट करत शाहरुखने लिहिलं, ‘थँक्यू लिटिल वन, तू फ्लॉवर आणि फायर या दोन्ही गोष्टी आहेस. आता माझ्या मुलांना मी ‘श्रीवल्ली’ गाण्याची प्रॅक्टिस करायला सांगतो. हाहाहा!’ शाहरुखच्या प्रतिक्रियेवर अल्लू अर्जुननेही कमेंट केली आहे. ‘शाहरुखजी, तुम्ही खूप प्रेमळ आहात. तुमच्या प्रेमळ संदेशाने आमचं मन जिंकलं. तुम्हाला आमच्याकडून भरभरून प्रेम’, असं अल्लू अर्जुनने लिहिलं.
पहा व्हिडीओ
Thank u lil one… you are flower and fire both rolled into one!!! Now getting my kids to practice singing @alluarjun’s Srivalli… ha ha https://t.co/XZr29SIhD2
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 25, 2024
राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुख खानचा ‘डंकी’ हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये शाहरुखसोबतच तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन इराणी, विक्रम कोच्चर यांच्या भूमिका आहेत.
दुसरीकडे अल्लू अर्जुन त्याच्या आगामी ‘पुष्पा 2’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा : द राईज’ हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. यामध्ये अल्लू अर्जुनसोबतच रश्मिक मंदाना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत होते. अल्लू अर्जुनला ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’देखील मिळाला आहे. यानिमित्ताने अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे.