‘बागबान’ फेम अभिनेत्याचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर; लग्नाच्या 9 वर्षांनंतर घेणार घटस्फोट?
'बागबान' या चित्रपटात ऑनस्क्रीन सलमान खानच्या भावाची भूमिका साकारलेला अभिनेता अमन वर्मा घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. पत्नी वंदना लालवानीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं कळतंय.

‘बागबान’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारलेला अभिनेता अमन वर्मा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अमन हा टीव्ही आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर तो पत्नी वंदना लालवानीला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. वंदनासुद्धा प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. एकेकाळी अमन आणि वंदना हे टीव्हीवरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. या दोघांनी डिसेंबर 2016 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या दोन वर्षे आधी 2014 मध्ये त्यांची भेट ‘हम ने ली है शपथ’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. आता दोघांच्या संसारात गेल्या काही वर्षांपासून खटके उडत असून त्यांनी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केल्याचं कळतंय.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमन आणि वंदना हे गेल्या काही वर्षांपासून त्यांचं नातं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यात यश न मिळाल्याने अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. “त्या दोघांमध्ये बऱ्याच काळापासून समस्या सुरू आहेत. या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्या नात्यात सुधारणा झाली नाही. दोघांनी फॅमिली प्लॅनिंगचाही विचार केला, परंतु मतभेदांमुळे आणि भांडणांमुळे त्यांना तेही शक्य झालं नाही. त्यामुळे वंदनाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती जोडप्याच्या जवळच्या व्यक्तीने दिली.




View this post on Instagram
घटस्फोटाच्या चर्चांवर अमनने कोणतीही थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. “मी यावर काहीच म्हणणार नाही. योग्य वेळी मी माझ्या वकिलामार्फत यावर प्रतिक्रिया देईन”, असं त्याने म्हटलंय. तर वंदनानेही घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडण्यास नकार दिला.
याआधी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत अमन त्याच्या लग्नाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला होता. “लग्नानंतर मी माणूस म्हणून खूप बदललोय. मी खूप शांत झालोय आणि आता मी कोणत्याच गोष्टीकडे लगेच आक्रमकतेने पाहत नाही. आधी मी खूप तापट होतो. माझ्यासाठी लग्न हे खूप मोठं पाऊल होतं, कारण मी बरीच वर्षे एकटाच राहिलोय. त्यामुळे जेव्हा योग्य व्यक्ती मला भेटेल, तेव्हाच मी लग्न करेन असं मी ठरवलं होतं. आता आमच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. सुदैवाने आमच्या काही तक्रारी नाहीत. वंदनासोबतचं आयुष्य मी एंजॉय करतोय”, असं तो म्हणाला.