मुंबई : अभिनेत्री अमीषा पटेलने 2000 मध्ये अभिनेता हृतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करिअरमधील तिचा पहिलावहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आता अमीषा बऱ्याच वर्षांनंतर ‘गदर 2’ या चित्रपटातून पुनरागमन करतेय. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या समकालीन अभिनेत्रींविषयी वक्तव्य केलं. करीना कपूर, अभिषेक बच्चन, ईशा देओल यांसारखे स्टार कुटुंबातून येणारे कलाकार तिच्या यशावर खुश होऊ शकले नाहीत, अशी खंत अमीषाने व्यक्त केली.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अमीषाने खुलासा केला की तिला ‘स्नॉब’ (इतरांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानणारी व्यक्ती) म्हटलं जायचं, कारण ती सेटवर इतरांविषयी वाईट बोलण्यापासून दूर राहायची. ती म्हणाली, “जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला, तेव्हा माझ्यासोबत फक्त सेलिब्रिटींची किंवा निर्मात्यांची मुलं इंडस्ट्रीत येत होती. ज्यामध्ये करीना कपूर, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, तुषार कपूर, ईशा देओल, फरदीन खान यांचा समावेश होता. हे सर्वजण फिल्मी कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे कलाकार होते. मी इंडस्ट्रीबाहेरील सुरक्षित कलाकार होती. मी अशा लोकांपैकी होती जी सेटवर इतरांबद्दल गॉसिप करायची नाही, मी पुस्तकं वाचत बसायची, इतरांबद्दल वाईट बोलायची नाही. याचमुळे मला स्नॉब म्हटलं जायचं, कारण मी गॉसिपऐवजी वाचणं पसंत केलं होतं.”
कहो ना प्यार है, गदर : एक प्रेम कथा आणि पवन कल्याणसोबतच्या ‘बद्री’ या चित्रपटांच्या यशानंतर तिचे समकालीन कलाकार तिच्या यशाकडे सकारात्मकतेने पाहू शकले नाहीत, असंही ती म्हणाली. “मग एकानंतर एक यश पाहणं, हृतिक आणि मला रातोरात देशातील सर्वांत लोकप्रिय सेलिब्रिटी होताना पाहणं आणि मग गदर चित्रपटाचं प्रदर्शित होणं आणि बद्री प्रेक्षकांच्या भेटीला येणं.. मग ते तेलुगू, तमिळ किंवा हिंदी चित्रपट असो. देव दयाळू होता, त्याला माहीत होतं की माझा कोणी गॉडफादर नाही. त्यामुळे देवाने मला यशस्वी चित्रपट दिले, मात्र माझे समकालीन कलाकार या यशाला सांभाळू शकले नाहीत. लोकांमध्ये माझ्याबद्दल फार ईर्षा होती, माझ्या नाकाखालून चित्रपट हिरावून घेतले गेले. मला चित्रपटांपासून दूर केलं गेलं होतं. हे मला त्यावेळी समजलं नव्हतं. मी चित्रपट साइन केले होते, माझ्या तारखा दिल्या होत्या. पण अचानक मी त्या चित्रपटाच्या सेटवर नसायचे, त्याऐवजी दुसरीच व्यक्ती तिथे असायची”, असा खुलासा अमीषाने केला.
अमीषाने असंही सांगितलं की अनेकदा तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आलं, याची माहितीही तिला देण्यात यायची नाही. “तेव्हा सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे अशा गोष्टी आताप्रमाणे जलद गतीने पसरायच्या नाहीत. आमच्याकडे फिल्म गाइड आणि ट्रेड गाइड होते, जे ऑफिसमध्ये यायचे, ज्यांना आम्ही वाचत होतो आणि त्यातून कळायचं की इंडस्ट्रीत नेमकं काय चाललंय? आता तर इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट करून सहजपणे सांगितलं जाऊ शकतं. मात्र तेव्हा आम्ही फक्त चांगल्या विश्वासाने सोबत काम करत होतो”, असं ती पुढे म्हणाली.