मुंबई : अभिनेत्री अमीषा पटेलने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती ‘गदर’सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकली. तब्बल 22 वर्षांनंतर याच चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमीषा सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती निर्माता-दिग्दर्शक विक्रम भट्टसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. अमीषाने विक्रम भट्टसोबतचं नातं जाहीर केलं होतं. मात्र त्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला. अमीषा आणि विक्रम हे जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते.
अभिनेत्री सुष्मिता सेनशी ब्रेकअप झाल्यानंतर विक्रम भट्टने अमीषाला डेट करण्यास सुरुवात केली. 2006 मध्ये ‘आँखे’ या चित्रपटात काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्रमच्या 1920 या चित्रपटानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. या नात्याविषयी बोलताना अमीषा म्हणाली, “या इंडस्ट्रीत प्रामाणिकपणाला कोणतीच जागा नाही आणि मी सर्वांत प्रामाणिक व्यक्ती आहे. माझ्या मनात जे असतं तेच माझ्या चेहऱ्यावर दिसतं. पण हाच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा ड्रॉबॅक ठरला आहे. निश्चितपणे मी फक्त ज्या दोन रिलेशनशिप्समध्ये होती आणि ज्याविषयी मी जाहीरपणे व्यक्त झाले, त्यांचाच माझ्या करिअरला मोठा फटका बसला. आता गेल्या 12-13 वर्षांपासून माझ्या आयुष्यात कोणीच नाही. फक्त शांतता आहे. मला माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नकोय.”
विक्रम भट्टसोबतचं नातं जाहीर केल्यानंतर प्रोफेशनल आयुष्यावर कसा परिणाम झाला याविषयी बोलताना अमीषा पुढे म्हणाली, “तुमच्या आजूबाजूला काम करत असलेल्या लोकांसाठी मुलीचं ‘सिंगल स्टेटस’ नेहमीच अधिक आकर्षक असतं. तुमच्या प्रेक्षकांसाठी ते नेहमीच खूप आकर्षक असतं. त्यांना असं वाटतं की तुम्ही अविवाहित असाल किंवा तुम्ही इंडस्ट्रीमधल्या एखाद्या सुपरस्टारला डेट करत असाल, तर त्याचा तुमच्या करिअरला फायदा होतो. अन्यथा ते या गोष्टी स्वीकारत नाहीत. एखादी अभिनेत्री जर अभिनेत्याला डेट करत असेल तर ती त्याच्यासोबत चित्रपटात काम करू शकते आणि सतत काम मिळवू शकते. माझ्याबाबत असं काहीच नव्हतं. त्यामुळे मला त्या गोष्टीचा फटका बसला आणि मी त्यातून शिकले.”
विक्रम भट्टने याआधी दिलेल्या मुलाखतीत अमीषासोबतच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं होतं. “नाही, मला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. आमच्यात कटुता आहे, अशीही गोष्ट नाही. सध्या पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय”, असं तो 2017 मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.