सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ केसबद्दल अमीषा पटेलने सोडलं मौन; म्हणाली “त्याच्यामुळेच..”
अमीषा आणि सलमानची मुख्य भूमिका असलेला 'ये है जलवा' हा चित्रपट 3 जुलै 2002 रोजी प्रदर्शित झाला होता. तर दुसरीकडे 28 सप्टेंबर 2002 रोजी सलमानला अटक करण्यात आली होती. मुंबईतील एका बेकरीमध्ये त्याची कार शिरली होती आणि त्या घटनेत एकाचा मृत्यू, चार जण जखमी झाले होते.
मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री अमीषा पटेलचा ‘गदर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर : एक प्रेम कथा’ याच चित्रपटाचा हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. देशभरातील थिएटरमध्ये त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. यानिमित्त अमीषाने विविध मुलाखती दिल्या असून त्यात बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा अमीषाला तिच्या अशा एका चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं, ज्यामध्ये हिट होण्याची क्षमता असूनही तो फ्लॉप ठरला. तेव्हा तिने लगेचच 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये है जलवा’ या चित्रपटाचं नाव घेतलं. यामध्ये अमीषा आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. इतकंच नव्हे तर या चित्रपटाचं फ्लॉप होण्यामागचं कारण तिने सलमानचा ‘हिट अँड रन’ केस असल्याचं म्हटलं आहे.
“सलमानमुळे चित्रपट झाला फ्लॉप”
“ये है जलवा हा डेविड धवन यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. त्यात सलमान खूप हँडसम दिसत होता. त्यातील म्युझिक आणि दिग्दर्शन चांगलं होतं. पण त्यापूर्वी माध्यमांनी दिलेल्या नकारात्मक बातम्या प्रेक्षकांना आवडल्या नाहीत. त्या काळी प्रेक्षक आपल्या लाडक्या अभिनेत्याबद्दल नकारात्मक बातमी पचवू शकत नव्हते. सलमानचा हिट अँड रन केस तेव्हाच घडला आणि त्यामुळे ये है जलवा हा चित्रपट बाजूला सारला गेला. जर प्रेक्षकांनी खुल्या मनाने या चित्रपटाचा स्वीकार केला असता, तर त्याने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कामगिरी केली असती”, असं अमीषा म्हणाली.
हिट अँड रन केस
अमीषा आणि सलमानची मुख्य भूमिका असलेला ‘ये है जलवा’ हा चित्रपट 3 जुलै 2002 रोजी प्रदर्शित झाला होता. तर दुसरीकडे 28 सप्टेंबर 2002 रोजी सलमानला अटक करण्यात आली होती. मुंबईतील एका बेकरीमध्ये त्याची कार शिरली होती आणि त्या घटनेत एकाचा मृत्यू, चार जण जखमी झाले होते.
या मुलाखतीत अमीषाने तिच्या आणखी एका चित्रपटाचा उल्लेख केला. “मी अजय देवगणसोबत जमीर हा चित्रपट केला होता. यामध्ये त्याने माझ्या प्रोफेसरची भूमिका साकारली होती. राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. दुर्दैवाने जेव्हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हाच निर्मात्यांचं निधन झालं. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत तो चित्रपट नीट पोहोचू शकला नाही”, असं ती म्हणाली.