Dhruvi Patel : ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ची विजेती, बॉलिवूडमध्ये पदार्पणाचं स्वप्न..
अमेरिकेत कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टमचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी ध्रुवी पटेल ही ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ची विजेती बनली आहे. या स्पर्धेतील विजेतेपदाचा मुकुट ध्रुवीच्या मस्तकावर विराजमान झाला आहे.
अमेरिकेत कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टमचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी ध्रुवी पटेल ही ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ची विजेती बनली आहे. या स्पर्धेतील विजेतेपदाचा मुकुट ध्रुवीच्या मस्तकावर विराजमान झाला आहे. या विजयमुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झालाय. ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ ही भारताबाहेर सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर ध्रुवीने बॉलिवूड अभिनेत्री आणि युनिसेफची ॲम्बेसेडर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विजेतेपदानंतर काय म्हणाली ध्रुवी ?
न्यू जर्सीतील एडिसन, येथे मिस इंडिया वर्ल्डवाइडची विजेती घोषित झाल्यानंतर ध्रुवी अत्यंत खुश आहे. “मिस इंडिया वर्ल्डवाइडचा किताब जिंकणे हा एक अभूतपूर्व सन्मान आहे. हे मुकुटापेक्षा अधिक आहे. माझा वारसा, माझी मूल्ये आणि जागतिक स्तरावर इतरांना प्रेरणा देण्याची संधि यातून दर्शवली जाते” असं तिने नमूद केलं
हे स्पर्धक पडले मागे
‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ या स्पर्धेत अनेक स्पर्धक होत्या, मात्र त्या सर्वांना मागे टाकून ध्रुवीने विजेतेपदावर नाव कोरलं. सुरीनामच्या लिसा अब्दोएलहकला ‘फर्स्ट रनर अप’ घोषित करण्यात आले, तर नेदरलँडच्या मालविका शर्माला ‘सेकंड रनर अप’ म्हणून घोषित करण्यात आले.
‘मिसेस’ गटात त्रिनिदाद आणि टोबॅगोची सुसान माउटेट विजेती, स्नेहा नांबियार ‘फर्स्ट रनर अप’ आणि ब्रिटनची पवनदीप कौर ‘सेकंड रनर अप’ ठरली. तर ग्वाडेलूपच्या सिएरा सुरेटला ‘टीन’ श्रेणीत ‘मिस टीन इंडिया वर्ल्डवाइड’चा मुकुट देण्यात आला. नेदरलँडची श्रेया सिंग आणि सुरीनामची श्रद्धा टेडजो यांना अनुक्रमे ‘फर्स्ट’ आणि ‘सेकंड रनर अप’ घोषित करण्यात आले.
ही सौंदर्य स्पर्धा न्यूयॉर्कस्थित ‘इंडिया फेस्टिव्हल कमिटी’ने आयोजित केली असून आणि भारतीय-अमेरिकन नीलम आणि धर्मात्मा सरन या स्पर्धेच्या अध्यक्ष आहेत. गेल्या 31 वर्षांपासून ही स्पर्धा सुरू आहे.