Indian Idol 13: ज्या शोची उडवली खिल्ली, त्याच्याच सेटवर पुन्हा लावली हजेरी
आधी 'इंडियन आयडॉल'ची केली पोलखोल; आता पुन्हा गेस्ट म्हणून केली एण्ट्री
मुंबई- ‘इंडियन आयडॉल 13’ या शोच्या आगामी एपिसोड अत्यंत धमाकेदार होणार आहे. प्रत्येक सिझननुसार यंदाही किशोर कुमार यांच्यासाठी एक एपिसोड समर्पित करण्यात आला आहे. या एपिसोडमध्ये खास पाहुणे म्हणून किशोर कुमार यांचे पुत्र आणि गायक अमित कुमार यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या एपिसोडचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अमित कुमार यांना काही कारणास्तव ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या या नव्या प्रोमोमध्ये सर्व स्पर्धक हे दिवंगत गायक किशोर कुमार यांची गाणी गाताना दिसत आहेत. इतकंच नाही तर अमित कुमार हे सुद्धा वडिलांची गाणी गातात आणि इतर स्पर्धकांना प्रोत्साहत देतात. इंडियन आयडॉल 13 ची स्पर्धक बिदिप्ताच्या गायकीचंही ते तोंडभरून कौतुक करतात.
नेटकरी का करतायत ट्रोल?
गेल्या वर्षी इंडियन आयडॉलच्या बाराव्या सिझनमध्ये अमित कुमार यांनी हजेरी लावली होती. या एपिसोडनंतर त्यांनी माध्यमांसमोर शोबाबत काही आरोप केले. निर्मात्यांनी मला शोमधल्या स्पर्धकांचं फक्त कौतुक करायला सांगितलं होतं, असं ते म्हणाले होते. काही स्पर्धकांच्या गायकीबद्दल मला स्पष्ट बोलायचं होतं, मात्र निर्मात्यांनी मला तसं करण्यास रोखलं होतं, असाही आरोप त्यांनी केला होता.
View this post on Instagram
शोविरोधात इतके आरोप करूनदेखील पुन्हा त्याच शोमध्ये पाहुणा म्हणून हजेरी लावल्याबद्दल नेटकऱ्यांनी अमित कुमार यांना ट्रोल केलं. ‘गेल्या वर्षी यांनीच शोबद्दल कॉन्ट्रोव्हर्सी केली होती, आता पुन्हा शोमध्ये आले’, असं एकाने लिहिलं. तर प्रत्येक सिझनमध्ये तेच तेच पाहुणे का येतात, असाही सवाल दुसऱ्या युजरने केला.