OMG 2 | ‘सेन्सॉर बोर्डासमोर हात जोडले, 70 मेसेज पाठवले तरी..’ ‘ओह माय गॉड 2’च्या दिग्दर्शकांकडून नाराजी व्यक्त
अक्षय कुमारच्या 'OMG 2' या चित्रपटाला 'A' ऐवजी 'U/A' प्रमाणपत्र मिळावं यासाठी निर्माते-दिग्दर्शकांकडून असंख्य प्रयत्न केले गेले. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना जवळपास 70 मेसेज पाठवल्यानंतरही त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : ‘गदर 2’सारख्या चित्रपटाकडून तगडी टक्कर असतानाही अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या ‘ओह माय गॉड 2’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. सेन्सॉर बोर्डाकडून ‘अ’ प्रमाणपत्र मिळूनही हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात सेक्स एज्युकेशनसारखा महत्त्वपूर्ण मुद्दा अत्यंत संवेदनशील पद्धतीने हाताळला गेला आहे. मात्र ज्या किशोरवयीन वर्गासाठी हा चित्रपट बनवला गेला, ज्यांनी हा चित्रपट पाहणं महत्त्वाचं होतं, त्यांनाच सेन्सॉर बोर्डाने ‘अ’ प्रमाणपत्र देऊन डावललं. असं होऊ नये यासाठी ‘OMG 2’चे दिग्दर्शक अमित राय यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसमोर हात जोडले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.
सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसमोर जोडले हात
‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अमित राय यांनी सांगितलं, “मला नीट आठवतंय की मी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसमोर हात जोडले होते. मी त्यांना सतत सांगत होतो की तुम्ही हे चुकीचं करत आहात. जर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला असता, तर मी तुमच्याकडे आलोच नसतो. पण हा विषय थिएटरद्वारे सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही ही रिस्क घेत आहोत.”
‘OMG 2’चा टीझर जेव्हा सेन्सॉर बोर्डाकडे गेला होता, तेव्हासुद्धा त्यांनी एका सीनवर कात्री चालवली होती. मुळात तो सीन 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘OMG’ या पहिल्या भागातील होता. तरीसुद्धा निर्मात्यांनी बोर्डाचे आदेश मानले. “ते क्रूर आहेत असं मी म्हणत नाही, पण त्यांच्याही काही मर्यादा असतील. त्याचे भूतकाळातील काही अनुभव असतील. सरकारने त्यांच्यावर ठराविक जबाबदारी सोपवली आहे आणि त्याचा प्रचंड दबाव त्यांच्यावर असेल”, असं अमित राय पुढे म्हणाले.
प्रसून जोशींना पाठवले 70 मेसेज
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला, तेव्हासुद्धा दिग्दर्शकांनी सेन्सॉर बोर्डाकडे पुन्हा विनंती केली. “मी त्यांना मीडियाद्वारे पुन्हा पुन्हा सांगितलं. सर, मी हात जोडून विनंती करतो की कृपया चित्रपटाला U/A प्रमाणपत्र द्या, जेणेकरून सर्वजण तो पाहू शकतील. तुम्ही A प्रमाणपत्र दिसून चित्रपटामागचा मूळ हेतूच नष्ट केला आहे”, अशी विनंती दिग्दर्शकांनी बोर्डाकडे केली. इतकंच नव्हे तर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना जवळपास 70 मेसेज पाठवल्याचा खुलासाही अमित राय यांनी या मुलाखतीत केला. मात्र त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळाली नाही.
‘OMG 2’ या चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र दिल्याबद्दल याआधीही इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘गदर 2’शी टक्कर आणि ‘अ’ प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.