मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत आहेत. ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना मोठी दुखापत झाली. त्यांच्या बरगड्यांना जबर मार लागला. उपचारानंतर ते गेल्या काही दिवसांपासून घरीच आराम करत आहेत. एकीकडे दुखापतीचं दुखणं झेलत असताना आता बिग बींना दुसरा त्रास जाणवत आहे. याबाबतची माहिती त्यांनी खुद्दा ब्लॉगद्वारे दिली. असह्य वेदनांमुळे अखेर मध्यरात्री त्यांना डॉक्टरांना घरी बोलावलं लागलं, असंही त्यांनी या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.
19 मार्च रोजी लिहिलेल्या या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी माहिती दिली की त्यांच्या बरगड्यांमधील दुखणं अजूनही कायम आहे. मात्र अचानक पायाच्या बोटांमध्ये वेदना सुरू झाल्या आहेत. ‘गरम पाण्याचा थोडा शेक दिल्यानंतरही वेदना काहीच कमी झाल्या नाहीत. बरगड्यांच्या वेदनांपेक्षा असह्य वेदना या बोटामुळे होऊ लागल्या. पायाच्या बोटाजवळ कॉलस आधीच होता, पण त्याखाली आता फोडही आली होती. अखेर मध्यरात्री डॉक्टरांना बोलवावं लागलं. कॉलसच्या खाली फोड येत असल्याचं मी पहिल्यांदाच ऐकलंय. याआधी असं कधीच अनुभवलं नव्हतं. पण वेदना मात्र असह्य होत्या’, असं त्यांनी लिहिलं.
या ब्लॉगमध्ये बिग बींनी पुन्हा पहिल्याप्रमाणे काम करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. ‘काम हेच नित्यक्रमाचं सार असावं आणि दिनचर्येचा जीवन जगण्यावर प्रभाव असावा. यापैकी एक जरी गोष्ट नसली तरी आपलं वैयक्तिक जग कोलमडतं. रुटीन हे प्रत्येक दिवसाला त्याच्या कार्यक्षमतेकडे मार्गदर्शन करते आणि रुटीन नसल्यास कार्यक्षमतेत व्यत्यत येतो. त्यामुळे मी स्वत:ला या त्रासातून मुक्त केलं पाहिजे. कामावर परत गेलं पाहिजे आणि पुन्हा रुटीन सुरू झालं पाहिजे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे हे लवकरच होईल अशी आशा आहे’, असं त्यांनी पुढे लिहिलं.
कॉर्न किंवा कॉलस हे त्वचेवरील एक आवरण असतं, जे शरीरावर कुठेही येऊ शकतं. मात्र बहुतांश वेळी हे पायाच्या बोटांजवळ किंवा तळपायावर आल्याचं पहायला मिळतं. कधी ते आवरण खडबडीत असतं किंवा कधी ते गाठ आल्यासारखं दिसतं. सहसा त्यामुळे वेदना होत नाहीत, मात्र जर इन्फेक्शन वाढलं असेल तर त्यामुळे वेदना जाणवू शकतात.
हैदराबादमध्ये आगामी ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बींना दुखापत झाली. यावेळी त्यांच्या बरगड्यांना मार लागला. हैदराबादमधील रुग्णालयात उपचारानंतर ते मुंबईतल्या निवासस्थानी परतले आहेत.