Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांचा हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अपघात झाला आहे. वयाच्या ८० व्या वर्षी ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला आहे.बिग बींच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अपघातानंतर बिग बी यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्यांना श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत असल्यामुळे शुटिंग रद्द करण्यात आली आहे. सध्या अभिनेते त्यांच्या मुंबई येथील जलसा बंगल्यावर आराम करत आहेत. डॉक्टरांनी बिग बींना काही आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. आता जोपर्यंत बिग बींची प्रकृती पूर्ण ठिक होत नाही, तोपर्यंत त्यांचं काम आणि शुटिंग बंद राहणार आहे.
वयाच्या ८० व्या वर्षी देखील बिग बी मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. येत्या काही दिवसांत बिग बी फक्त ‘प्रोजेक्ट के’सिनेमातूनच नाही तर, सहा सिनेमांतून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण अमिताभ बच्चन यांचा अपघात झाल्यामुळे सिनेमांचं शुटिंग रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सिनेमांना मोठा फटका बसणार अशी चर्चा तुफान रंगत आहे.
अमिताभ बच्चन स्टारर ‘ऊंचाई’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. पण विश्लेषकांनी आणि चाहत्यांनी सिनेमाचं कौतुक केलं. आता बिग बी ‘गणपत’, ‘घूमर’, ‘द उमेश क्रॉनिकल्स’, ‘प्रोजेक्ट K’, ‘बटरफ्लाय’, ‘खाकी 2’ या सहा सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘गणपत’, ‘घूमर’, ‘द उमेश क्रॉनिकल्स’ या सिनेमांमध्ये बिग बी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.
बिग बीच्या अपघातानंतर ‘प्रोजेक्ट K’सिनेमावर मोठं संकट आलं आहे. सिनेमात बिग बींसोबत अभिनेता प्रभास, दीपिका पादुकोण, दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘प्रोजेक्ट K’ सिनेमाची शुटिंग २०२१ मध्ये सुरु झाली. पण कोरोना असल्यामुळे सिनेमाचं शुटिंग पूर्ण होवू शकलं नाही. आता बिग बी जखमी झाल्यामुळे सिनेमाचं शुटिंग थांबलं आहे.
‘प्रोजेक्ट K’ सिनेमा ५०० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा भारतातील सर्वांत जास्त बजेट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. अशात अमिताभ बच्चन यांचा अपघात झाल्यामुळे सिनेमाला मोठा फटका बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अमिताभ बच्चन कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांपर्यंत पोहोवत असतात. अनेक वर्ष सिनेमांच्या माध्यामातून चाहत्यांच्या मनार राज्य करणाऱ्या बिग बी साता समुद्रापार देखील प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या अपघाताची बातमी ऐकताच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. पण खुद्द बिग बींनी काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं सांगितलं आहे.