Amitabh Bachchan: त्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? अमिताभ बच्चन यांची आईबद्दल भावूक पोस्ट
"सोडून द्या डॉक्टर.. त्यांची जायची इच्छा आहे", आईच्या अखेरच्या क्षणांदरम्यान बिग बी डॉक्टरांना काय म्हणाले?
मुंबई: बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन हे त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून अनेक विषयांबद्दल व्यक्त होतात. या ब्लॉगमध्ये ते त्यांच्या खासगी आयुष्यातील अनुभव, किस्से, आठवणीसुद्धा लिहितात. आई तेजी बच्चन यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी अत्यंत भावूक ब्लॉग लिहिला आहे. यामध्ये त्यांनी आईसोबतच्या अखेरच्या क्षणांचा उल्लेख केला. आईची प्रकृती खालावली असताना कुटुंबीयांची परिस्थिती कशी होती, नेमकं त्यावेळी काय घडलं होतं, हे सर्व त्यांनी त्यात लिहिलं. 15 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन यांचं निधन झालं होतं.
अम्मा जी ही या ब्रह्मांडामधील सर्वांत सुंदर आई होती, असं त्यांनी लिहिलं. रुग्णालयात डॉक्टर अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते आणि आईने या जगाचा निरोप घेतला, असं बिग बींनी लिहिलं. अमिताभ बच्चन हे त्यांच्या आईच्या खूप जवळ होते. सोशल मीडियावर अनेकदा ते आईचा उल्लेख करतात. मात्र पहिल्यांदाच त्यांनी ब्लॉगमध्ये आईच्या अखेरच्या क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला.
अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, ‘डॉक्टर त्यांच्या नाजूक हृदयाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत होते, ते सतत त्यांचा श्वास परत आणण्यासाठी पंप करत होते आणि त्यांनी स्वभावाप्रमाणे अत्यंत शांततेने या जगाचा निरोप घेतला. मी उभा राहिलो.. कुटुंबीयांचा आणि जवळच्या व्यक्तींचा हात पकडला, तोवर मुलांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.’
‘मी बोललो, सोडून द्या डॉक्टर.. त्यांना सोडून द्या.. त्यांची जायची इच्छा आहे, तुम्ही थांबा.. आणखी प्रयत्न करू नका. प्रत्येक प्रयत्न त्यांना त्रास देत होता आणि हे सर्व पाहून मला वाईट वाटत होतं. प्रत्येक वेळी सरळ रेषा दिसायची आणि त्यांच्या शरीराला पंप केलं जात होतं. मी म्हटलं ना.. थांबा.. आणि ते थांबले. मॉनिटरमध्ये सरळ रेषेसोबत एक आवाज येऊ लागला. त्या आम्हाला आणि या जगाला सोडून कायमच्या गेल्या आहेत याचा इशारा तो आवाज देत होती’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
‘आईच्या निधनानंतर मी त्यांच्या डोक्यावरून हळूहळू हात फिरवत होतो आणि रुग्णालयातील त्या स्मशानशांततेदरम्यान माझ्या मनात आठवणींची मोठी लाट आली. जेव्हा त्यांना घरी आणलं, तेव्हा प्रतीक्षा बंगल्याचा हॉल एकदम स्वच्छ करण्यात आला होता. त्यांचा फोटो.. त्यांचा प्रेमळ चेहरा, काही पांढरी फुलं.. आणि यादरम्यान फक्त शांतता.. आणि त्या शेवटच्या झोपून गेल्या,’ असं त्यांनी पुढे लिहिलं.
अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की त्यादिवशी ते आईसोबत रात्रभर बसले होते. कुटुंबीयांसोबत त्यांनी रात्रभर ग्रंथसाहेबचं पठण केलं. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.