फिल्म इंडस्ट्रीत 55 वर्षे पूर्ण केल्यानिमित्त अमिताभ बच्चन यांना AI कडून ही खास भेट
अमिताभ यांना हिंदी चित्रपटसृष्टीत 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1969 मध्ये 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो AI जनरेटेड असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
मुंबई : 17 फेब्रुवारी 2024 | शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांना हिंदी चित्रपटसृष्टीत 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त बिग बींनी सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने अमिताभ बच्चन यांच्या प्रवासाला 55 वर्षे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक खास चित्र तयार करण्यात आलं आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘चित्रपटसृष्टीच्या या अद्भुत विश्वात 55 वर्षे पूर्ण.. ही गोष्ट AI ने मला त्याच्यात अंदाजात समजावून सांगितली’, अशा आशयाचं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. एआय जनरेडेट या फोटोमध्ये संपूर्ण सिनेविश्व पहायला मिळतंय.
बिग बींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेता, एकमेव बिग बी’ असं एकाने लिहिलंय. तर ‘अमितजी, तुम्ही यापेक्षाही मोठे कलाकार आहात. सिनेसृष्टीतील तुमचं योगदान अतुल्य आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. बिग बींची मुलगी श्वेता बच्चननेही या फोटोवर ‘लव्ह इट’ (हे आवडलंय) अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांनी 1969 मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून आपल्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटाला 55 वर्षे पूर्ण होत असतानाच बिग बींना अभिनयाच्या विश्वात येऊन 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडमध्ये अमिताभ यांनी या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, जेव्हा ते पहिल्यांदा ऑडिशनला गेले होते आणि दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांना समजलं की ते महान कवी हरिवंशराय बच्चन यांचे पुत्र आहेत, तेव्हा त्यांनी हरिवंशराय बच्चन यांना बिग बींच्या योजनेबद्दल सांगण्यासाठी फोन केला होता.
बिग बी म्हणाले, “जेव्हा मी ‘सात हिंदुस्तानी’च्या ऑडिशनसाठी गेलो होतो, तेव्हा ख्वाजा अब्बास यांनी माझं नाव विचारलं. मी अमिताभ बच्चन असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांचं नाव विचारलं. वडिलांचं नाव हरिवंशराय बच्चन असल्याचं सांगितल्यावर त्यांनी मला बाहेर थांबायला सांगितलं आणि थेट माझ्या वडिलांना फोन केला. त्यांना वाटलं की मी त्यांना न सांगता ऑडिशन देण्यासाठी आलो आहे. म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना फोन केला आणि विचारलं की त्यांना याविषयी माहित आहे की नाही?”